‘पोलिस रेझिंग डे’ निमित्त शालेय मुलांनी अनुभवला खाकीचा दरारा व कार्यपद्धती
हत्यांरांचे कुतूहलाने केले निरीक्षण : पिस्तूल, बंदूकांना हात लावून इच्छा केली पूर्ण
भुसावळ (8 जानेवारी 2026) : महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सप्ताहाचे औचित्य साधून शहर पोलीस ठाण्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘खाकी’ वर्दीबद्दल असलेले कुतूहल शमवण्यासाठी आणि पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाची ओळख करून देण्यासाठी शहरातील के. नारखेडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. यावेळी शस्त्रास्त्रांची माहिती घेताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत चमक आणि पोलिसांविषयी आदर पाहायला मिळाला.
शहर पोलीस ठाण्याचा उपक्रम
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनाच्या वतीने ‘पोलीस रेझिंग डे’ साजरा केला जात आहे. सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांची प्रतिमा सकारात्मक व्हावी व त्यांना कायद्याची माहिती मिळावी, या उद्देशाने भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. पोलिसांचे कसे चालते विश्व हे विद्यार्थ्यांनी जाणून घेतांना पोलीस ठाण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना केवळ इमारतीची सफरच घडवून आणली नाही, तर प्रत्येक विभागाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.


विद्यार्थ्यांनी याच्या घेतल्या नोंदी
ठाणे अंमलदार यांच्याकडे तक्रार कशी नोंदवली जाते. सीसीटिएनएस संगणकीय प्रणालीद्वारे गुन्ह्यांची नोंद कशी होते.गोपनीय व क्राईम शाखा गुन्हेगारांचा शोध आणि गुप्त माहितीचे संकलन. मुद्देमाल कक्षाचे कामाचे स्वरूप, जप्त केलेली मालमत्ता कशी सुरक्षित ठेवली जाते. वायरलेस विभागातर्फे बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे संवाद कसा साधला जातो. शस्त्रास्त्रांचे आकर्षण आणि बीएनएसची माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांना आकर्षण
या भेटीचे मुख्य आकर्षण म्हणजे पोलिसांनी वापरली जाणारी शस्त्रास्त्रे. यावेळी विद्यार्थ्यांना विविध रायफल्स, रिव्हॉल्व्हर आणि इतर सुरक्षा साधनांची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, बदललेल्या कायद्यानुसार आता भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत पोलीस कशी कारवाई करतात, याची प्राथमिक माहितीही वरिष्ठ अधिकार्यांनी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत दिली. विद्यार्थ्यांनी हत्यारांना हात लावून आनंद घेतला.

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
आजवर केवळ चित्रपट किंवा बातम्यांमध्ये पाहिलेले पोलीस ठाणे जवळून पाहता आल्याने विद्यार्थी भारावून गेले होते. पोलीस निरीक्षकांच्या दालनापासून ते कोठडीपर्यंतची माहिती घेताना विद्यार्थ्यांनी अनेक शंकाही विचारल्या, ज्यांचे पोलिसांनी आनंदाने निरसन केले. यावेळी वाहतूक शाखेच्या नियमांची सुध्दा विद्यार्थ्यांना वेळी माहिती देण्यात आली.
विद्यार्थी हे भविष्यातील सुजाण नागरिक
विद्यार्थ्यांच्या मनात पोलिसांबद्दल असलेली भीती दूर होऊन मैत्रीचे नाते निर्माण व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. भविष्यातील सुजाण नागरिक म्हणून त्यांना कायद्याचे भान असावे, यासाठी आम्ही त्यांना पोलीस दलाच्या कार्यपद्धतीचे प्रात्यक्षिक दाखवल्याचे शहर निरीक्षक उध्दव डमाळे म्हणाले.







