साकेगावात विद्यार्थ्यांच्या रॅलीतून घुमला ‘सुरक्षेचा’ जागर
पोलीस स्थापना दिन : पीएसआय पूजा अंधारे यांनी विद्यार्थ्यांना दिली ‘गुड टच-बॅड टच’सह सायबर सुरक्षेची गुरुकिल्ली
भुसावळ (8 जानेवारी 2026) : महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून सोमवारी साकेगाव येथे पोलीस आणि विद्यार्थी यांच्यात एक आगळावेगळा संवाद पाहायला मिळाला. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनतर्फे साकेगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केवळ कायद्याचे धडेच गिरवले नाहीत, तर रॅलीद्वारे संपूर्ण साकेगाव परिसर जनजागृतीच्या घोषणांनी दणाणून सोडला.
‘गुड टच-बॅड टच’ मधील सांगितला फरक
आजच्या धावपळीच्या युगात मुले सायबर गुन्हेगारी आणि असुरक्षिततेच्या विळख्यात अडकत आहेत. हे ओळखून पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. इंटरनेट वापरताना कोणती काळजी घ्यावी, रस्ते अपघातांपासून वाचण्यासाठी ट्रॅफिक नियमांचे पालन कसे करावे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी ’गुड टच-बॅड टच’ मधील फरक समजावून सांगत, संकटकाळी ’पोलीस काका’ आणि ‘पोलीस दीदी’ तुमच्या हक्काचे सोबती असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण केला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भारतीय न्याय संहिता आणि महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या नवीन तरतुदींची प्राथमिक माहिती देण्यात आली. गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी उपलब्ध असलेल्या हेल्पलाइन क्रमांकांबाबतही विद्यार्थ्यांना अवगत करण्यात आले. डीवायएसपी केदार बारबोले, निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


रॅलीने वेधले साकेगावकरांचे लक्ष
मार्गदर्शनानंतर सकाळी 11.30 वाजता विद्यालयापासून भव्य जनजागृती रॅलीला सुरुवात झाली. हातात जनजागृतीचे फलक घेतलेले 100 ते 120 विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. ही रॅली आंबेडकर नगर, पटेल गल्ली, ग्रामपंचायत कार्यालय, वाघोदे गल्ली अशा मुख्य मार्गांवरून फिरली. पोलीस आमचे मित्र, नियम पाळा-अपघात टाळा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. दुपारी 12.40 वाजता पुन्हा विद्यालयात रॅलीचा समारोप झाला.
पोलीस ‘दीदी’चा कानमंत्र
विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता जागरूक राहणे गरजेचे आहे. सायबर फसवणूक असो वा छेडछाड, पोलिसांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. ’पोलीस दीदी’ ही संकल्पना शालेय विद्यार्थिनींच्या मनातील भीती दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे भुसावळ तालुक्याचे उपनिरीक्षक पूजा अंधारे म्हणाल्या.







