नायलॉन मांजा विक्री केल्यास अथवा वापरात आणल्यास दाखल होईल सदोष मनुष्यवध प्रयत्नाचा गुन्हा

भुसावळात मकरसंक्रांतीपूर्वी पोलिसांचा कडक इशारा : पाच विक्रेत्यांना नोटिसा


Selling or using nylon kite string will result in a charge of attempted culpable homicide भुसावळ (9 जानेवारी 2026) : आगामी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन (सिंथेटिक) मांजाच्या विक्री व वापराविरोधात पोलिसांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. यावर्षी केवळ मांजा जप्तीपुरती कारवाई न करता, भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत थेट सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न असा गंभीर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पाच विक्रेत्यांना पोलिसांनी नोटीसा बजावण्यात आल्या.

शहरातील पाच विक्रेत्यांना नोटीसा
नायलॉन मांजा मानवी जीव, पशुपक्षी व सार्वजनिक सुरक्षेस अत्यंत घातक आहे. यामुळे गळा चिरून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना यापूर्वी घडल्या आहेत. विक्री करणार्‍याला या धोक्याची पूर्ण जाणीव असूनही फायद्यासाठी मांजा विकला जात असल्यास,तो गुन्हा सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’या सदरात येतो, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हा गुन्हा अजामीनपात्र असून कठोर शिक्षेची तरतूद आहे. शहरातील बाजारपेठ पोलीस ठाणे व शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत भुसावळ शहरात पाच मांजा विक्रेत्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली.

नागरिकांना आवाहन
नागरिकांनी व पालकांनी आपल्या मुलांना नायलॉन मांजा खरेदी करून देऊ नये. हा मांजा तुटत नसल्याने दुचाकीस्वारांच्या गळ्याला अडकून गंभीर अपघात होतात. तसेच वीज वाहिन्यांवर अडकल्यास शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका असतो.

अशी करावी तक्रार
आपल्या परिसरात नायलॉन मांजाची विक्री होत असल्यास नागरिकांनी तत्काळ 112 या हेल्पलाईनवर किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात माहिती द्यावी. माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मकरसंक्रांती सण सुरक्षित व अपघातमुक्त वातावरणात साजरा व्हावा, यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !