पाडळसेत श्रीमद् भागवत दशमस्कंध कथा महोत्सवाला सुरुवात


पाडळसे, ता.यावल (10 जानेवारी 2026) : श्री स्वामीनारायण मंदिर दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त पाडळसे येथे श्रीमद् भागवत दशमस्कंध कथा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. 9 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान श्रीमद भागवत दशम स्कंध कथा आयोजित करण्यात आली. या पवित्र आयोजनासाठी एस.एम.चौधरी, उदय चौधरी, भालचंद्र चौधरी, चंद्रकांत चौधरी आदींनी सहकार्य केले आहे.या संपूर्ण कार्यक्रमात सर्व भक्तांना एकत्र जोडण्याचे, समन्वय साधण्याचे आणि आयोजन यशस्वी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य गोपाळ भगत यांनी अत्यंत निष्ठेने पार पाडले.

पाडळसा येथे भागवत कथेचा प्रारंभ
श्री स्वामीनारायण मंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत महापुराण अंतर्गत दशम स्कंध कथेचा भक्तिभावपूर्ण प्रारंभ मोठ्या उत्साहात झाला. या पावन कथेचे कथावक्ते परम पूज्य शास्त्री ईश्वरस्वरूपदासजी स्वामी (स्वामिनारायण गुरुकुल साकेगाव सदस्य) आहेत. त्यांना पूज्य के. के. शास्त्रीजी यांचे आशीर्वाद लाभले आहेत. या सभेचे सूत्रसंचालन शास्त्री नयनप्रकाशदासजी (जळगाव) यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.

कथेच्या प्रथम दिवशी संध्याकाळी पाच वाजता श्रीकृष्ण प्रागट्य उत्सव मोठ्या धामधुमीत व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. फुलांची उधळण, भक्तीगीतांचा गजर, टाळ-मृदंगाच्या नादात संपूर्ण परिसर कृष्णमय झाला होता. उपस्थित भाविकांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने या सोहळ्यात सहभाग घेतला.

कथेच्या द्वितीय दिवशी सकाळच्या प्रथम सत्रात मीराबाईंच्या चरित्राचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन करण्यात आले. मीराबाईंच्या निष्कलंक भक्तीचे उदाहरण देत स्वामीजींनी भक्तीमार्गाचे महत्व अत्यंत सोप्या आणि प्रभावी शब्दांत सांगितले.

त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात दधीमंथन प्रसंगाची कथा सजीव देखाव्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आली. या देखाव्यांमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले आणि कथेमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाल्याचा अनुभव सर्वांना मिळाला.

या कथेचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भक्त उपस्थित असून, पुढील दिवसांतही ही कथा भक्तिरसाची गंगा वाहवत राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !