धुळे स्थानिक गुन्हे शाखेची साक्री मोठी कारवाई : 28 हजारांच्या नॉयलॉन मांजासह संशयीत जाळ्यात
Dhule Local Crime Branch’s major operation in Sakri: Suspect apprehended along with nylon kite string worth 28000 rupees धुळे (10 जानेवारी 2026) : नॉयलॉन मांजाच्या विक्री व वापरावर निर्बंध असतानाही विक्रीसाठी नॉयलॉन, सिंथटिक व चायनीज मांजा आणल्याने साक्री शहरातील एका विक्रेत्यावर साक्री पोलिस व धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करीत 28 हजारांचा मांजा जप्त केला. या कारवाईने नॉयलॉन मांजाची चोरटी विक्री करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली. योगेश सुनील जगताप (26, लोकमान्य नगर, साक्री) असे गुन्हा दाखल झालेल्या विक्रेत्याचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना साक्री शहरातील लोकमान्य नगरातील योगेश सुनील जगतापच्या घरात प्रतिबंधीत नॉयलॉन मांजाचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी साक्री पोलिसांसोबत शुक्रवार, 9 रोजी संयुक्त कारवाई करीत 13 हजार 500 रुपये किंमतीचा गोल्ड कंपनीचा नॉयलॉन मांजा, 14 हजार रुपये किंमतीचा मोनो केटीसी कंपनीचा नॉयलॉन मांजा जप्त केला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, साक्री निरीक्षक दीपक वळवी, उपनिरीक्षक संजय पाटील, अंमलदार बापू रायते, सदेसिंग चव्हाण, पंकज खैरमोडे, तुषार सूर्यवंशी, महेंद्र सपकाळ, अतुल निकम, साईनाथ पवार, रोशन चित्ते, अनिता भदाणे आदींच्या पथकाने केली.

