महानगरपालिका निवडणूक ; जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांना 15 जानेवारीला सुटी
मतदानाच्या दिवशी कामकाज बंद : सुटी भरपाईसाठी 14 फेब्रुवारीला न्यायालये सुरू
Municipal corporation elections; all courts in Jalgaon district will be closed on January 15th भुसावळ (11 जानेवारी 2026) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, 15 जानेवारी हा मतदान दिवस निश्चित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांना स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. क्यु. एस. एम. शेख यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत.
14 रोजी न्यायालये राहणार सुरू
या आदेशानुसार, जळगाव मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अपीलीय, दिवाणी व फौजदारी न्यायालये तसेच त्यांची कार्यालये 15 जानेवारी रोजी बंद राहणार आहेत. मतदान प्रक्रियेत नागरिकांना निर्बंधाविना सहभागी होता यावे तसेच न्यायालयीन अधिकारी व कर्मचार्यांनाही मतदानाचा अधिकार बजावता यावा, या उद्देशाने ही सुटी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, 15 जानेवारी रोजीची ही सुटी भरून काढण्यासाठी शनिवार, दि. 14 फेब्रुवारी 2026 (दुसरा शनिवार) या दिवशी जळगाव मुख्यालयासह संपूर्ण जिल्ह्यातील सर्व न्यायालये व त्यांची कार्यालये सुरू राहणार आहेत, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे न्यायालयीन कामकाजावर निवडणुकीचा परिणाम होणार नसू प्रलंबित प्रकरणांची सुनावणी व प्रशासकीय कामकाजाची भरपाई पुढील महिन्यात केली जाणार असल्याची माहिती न्यायालय प्रशासनाने दिली आहे.


