भुसावळ रनमध्ये एक हजारहून अधिक नागरिक धावले आरोग्यासाठी
रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी, मंत्री संजय सावकारे यांचा स्तुत्य उपक्रम : लकी ड्रॉद्वारे बक्षिसांची लयलूट
More than a thousand citizens participated in the Bhusawal run for health भुसावळ (12 जानेवारी 2026) : भुसावळ शहरात रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी आणि मंत्री संजय सावकारे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रन भुसावळ’ या मॅरेथॉनला भुसावळकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘फिट भुसावळ’चा नारा देत पहाटे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून एक हजार 63 अबालवृद्ध धावपटू एकाच ध्येयाने धावले. वाढलेल्या थंडीत सुध्दा मैदान भरलेले होते.
थंडीतही क्रीडा प्रेमींचा उत्साह
रविवारी पहाटे थंडी असतानाही क्रीडाप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहिला. कार्यक्रमाची सुरुवात झुंबा प्रशिक्षक पारुल वर्मा यांनी करून दिली.संगीताच्या तालावर झुंबा डान्स करत स्पर्धकांनी ‘वार्मअप’ केले आणि वातावरणात चैतन्य भरले. या स्पर्धेत 3 किमी, 5 किमी आणि 10 किमी अशा तीन गटांत धावपटू सहभागी झाले होते. यावेळी माजी मंत्री संजय सावकारे, इव्हेंट अंबेसेडर सीए प्रतीक मणियार (जळगाव), डीवायएसपी केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक उमेश महाले यांची प्रमुख उपस्थिती होती. ओबेनॉल फाउंडेशनचे अश्विन परदेशी, किड्स गुरुकुलचे करण जैन, एस.आर.मार्बलचे सीताराम सैनी, पंकज कृपालांनी, अॅड.तुषार पाटील, देवेंद्र गीते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

नियोजनाची चोख अंमलबजावणी
धावपटूंना मार्गावर कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रोटरी क्लब आणि वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जागोजागी पिण्याचे पाणी, एनर्जी ड्रिंक्स आणि प्रथमोपचाराची व्यवस्था करण्यात आली. बिसारा रनर ग्रुप, तापी रनर ग्रुप आणि राधाकृष्ण प्रभात फेरीच्या सदस्यांनी स्वयंसेवक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. शहरातील क्रीडा शिक्षकांनी स्पर्धेचे तांत्रिक संचालन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले.
लकी ड्रॉने वाढवला आनंद
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यात क्रमांक न काढता सहभागी सर्व स्पर्धकांमधून ‘लकी ड्रॉ’ पद्धतीने विजेते निवडण्यात आले. यात भाग्यवान विजेत्यांना साऊंड सिस्टिम आणि एलईडी टीव्ही देऊन गौरविण्यात आले. एलईडी टीव्ही विजेता हा साई दिलीप सोनवणे. साऊंड सिस्टिम विजेते डॉ.पूजा बलके, युवराज सूर्यवंशी, धीरज बारेला, शुभम तिवारी, प्रमिला परिहार होते. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला मेडल, प्रमाणपत्र आणि पौष्टिक नाश्ता देण्यात आला. सूत्रसंचालन डॉ.मकरंद चांदवडकर यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्ट चेअरमन सुयश न्याती, को-चेअरमन चेतन पाटील, अध्यक्ष देवा वाणी, सचिव हरमित सिंग माखन आणि सर्व रोटेरियन सदस्यांनी परिश्रम घेतले.

