भुसावळातील रेल्वे अभियंत्याला रेल्वेचा राष्ट्रीय सन्मान
हिमांशु रामदेव यांना अति विशिष्ट रेल सेवा पुरस्काराने गौरव
A railway engineer from Bhusawal receives a national railway award भुसावळ (12 जानेवारी 2026) : भुसावळ विभागातील वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (ऑपरेशन्स) हिमांशु रामदेव यांना भारतीय रेल्वेच्या 70व्या रेल्वे सप्ताहानिमित्त दिला जाणारा अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार (एव्हीआरएसपी) 2025 प्रदान करण्यात आला. हा सन्मान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते 9 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथील यशोभूमी, इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर (द्वारका) येथे झालेल्या समारंभात देण्यात आला.
कार्याची दखल घेत पुरस्कार
रेल्वेच्या ऑपरेशन्स क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत रामदेव यांनी केलेल्या अभिनव कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी यार्ड सिग्नल्सचे प्रशिक्षण अधिक सोपे व प्रभावी करण्यासाठी यार्ड सिग्नल लेआउट अॅप’विकसित केले असून, यामुळे लोको पायलट व क्रू सदस्यांना प्रत्यक्ष यार्डमधील सिग्नल व्यवस्थेचे सखोल आणि दृश्यात्मक प्रशिक्षण मिळू लागले आहे. तसेच क्रूच्या कार्यकाळावर आणि विश्रांतीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी ‘ओएचएमएस’अॅप विकसित करण्यात आले आहे. या प्रणालीमुळे क्रू व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध झाले असून, मानवी त्रुटी कमी होऊन ऑपरेशनल कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे.

या दोन्ही उपक्रमांमुळे भुसावळ विभागात क्रूशी संबंधित अपयश व विलंबामध्ये तब्बल 59 टक्के घट झाली असून, रेल्वे सेवेच्या विश्वासार्हतेत मोठी वाढ झाली आहे. हिमांशु रामदेव यांच्या या नवोन्मेषी कार्यामुळे भुसावळ विभागासह संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापनाचे आदर्श उदाहरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल रेल्वे प्रशासनासह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

