भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात उद्या वार्षिक स्नेहसंमेलन
भुसावळ (12 जानेवारी 2026) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात मंगळवार, 13 रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसोबतच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने दरवर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यांची असेल उपस्थिती
या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सदस्य राधेश्याम लाहोटी, शिरीष नाहाटा यांच्याहस्ते होईल. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.जीवन धांडे असतील.
स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.जे.व्ही.धनवीज, प्रा.एस.टी.गावंडे उपस्थित राहणार आहेत. स्नेहसंमेलन सचिव धनश्री भालेराव आणि हिताक्षी दांडवेकर या विद्यार्थिनी प्रतिनिधी उपस्थित राहतील. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन विना लाहोटी यांच्याहस्ते होणार आहे. व्यासपीठावर पद्मा कोटेचा, ममता जैन, अनिता संघवी, सीमा अग्रवाल उपस्थित राहतील.

कलागुणांचे होणार सादरीकरण
स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने नृत्य, गायन, नाट्यप्रयोग, एकांकिका, वक्तृत्व, फॅशन शो तसेच विविध मनोरंजनात्मक व बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असून कार्यक्रम रंगतदार ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पारितोषिक वितरणाला यांची असेल उपस्थिती
पारितोषिक वितरण समारंभासाठी अध्यक्ष राजेश सुराणा, प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, दीपेश कोटेचा, सुगनचंद सुराणा, प्रशांत अग्रवाल, संजय सुराणा यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात येईल. स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन स्नेहसंमेलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

