भुसावळसह वरणगावकरांची चिंता मिटली : हतनूर धरणातून यंदाच्या मोसमातील पहिले आवर्तन सुटले

जलसंपदा मंत्री ना गिरीष महाजन यांनी 1 मिनिटात आवर्तन सोडण्याचे दिले आदेश : एक हजार क्यूसेक पाणी भुसावळच्या बंधार्‍यात तीन दिवसांनी पोहोचणार !


  • गणेश वाघ

भुसावळ (12 जानेवारी 2025) : भुसावळ शहराला तसेच रेल्वे विभागाला पाणीपुरवठा करणार्‍या तापीनदीतील अप्पर व निम्न बंधार्‍यातील जलसाठा कमी झाल्याने शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. हतनूर प्रशासनाकडे आवर्तन सोडण्याची मागणी केल्यानंतर सोमवार, 12 जानेवारी सकाळी यंदाच्या मोसमातील पहिले एक हजार क्यूसेक आवर्तन सोडण्यात आल्याची माहिती खास सूत्रांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ला दिली. तापी नदीतील रेल्वे व पालिकेच्या बंधार्‍यात हे पाणी अडवून शहराला आगामी 30 दिवस पुरवठा केला जाणार आहे.

शहरवासीयांना दिलासा
हतनूर धरणात भुसावळ शहर व रेल्वे विभागाचे वार्षिक पाणी आरक्षण आहे. पावसाळ्यानंतर दरवर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये हतनूर धरणातून आवर्तन सोडून तापी पात्रातील रेल्वे व पालिकेच्या बंधार्‍यात जलसाठा केला जावून नंतर पाण्याची उचल करुन शहर व रेल्वे विभागाला पाणीपुरवठा होतो.

बंधार्‍यातील जलपातळी कमी झाल्याने हतनूरमधून आवर्तनाची गरज भासली होती. यानुसार पालिका व रेल्वे विभागाने हतनूर प्रशासनाकडे मागणी केल्याने सोमवारी एक हजार डे क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. दोन दिवस हे आवर्तनाचे पाणी सुरू राहणार असून दोन दिवसात ते पालिकेच्या बंधार्‍यात पोहोचणार आहे.

वरणगावचा प्रश्नही मिटणार
काही दिवसांपासून वरणगाव येथील पाणीप्रश्नही बिकट झाला होता. तापीनदीत वरणगाव पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल नदीच्या काठावर आहे. पाणीपातळी कमी झाल्याने उचल थांबली होती. आता हतनूरमधून आवर्तन दिल्यानंतर जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचणार असल्याने वरणगाव शहरातील पाणीपुरवठाही सुरळीत होऊ शकणार आहे.
दरम्यान, लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी शनिवारी सकाळीच तापी नदीवरील जॅकवेल येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला होता. मंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ दखल घेत
अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन यांच्याशी एका मिनिटात बोलून आवर्तन सोडतो, असा शब्द दिल्यानंतर तातडीने आवर्तनाचे पाणी सोडण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

यांची होती उपस्थिती
पाहणीवेळी पाणीपुरवठा विभागाचे मुक्तार भाई, किरण जाधव तसेच सहकारी मिलिंद भैसे, योगेश महाजन माळी आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !