भुसावळातील कोटेचा महिला महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थिनींच्या कलागुणांना मिळाली दाद


At the annual gathering of Kotecha Women’s College in Bhusawal, the talents of the students were appreciated भुसावळ (13 जानेवारी 2026) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महाविद्यालयात मंगळवार, 13 रोजी स्नेहसंमेलन पार पडले. यावेळी मैदानी स्पर्धा व पदम आर्ट गॅलरीचेही थाटात उद्घाटन करण्यात आले. दुसर्‍या सत्रात रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली तर विद्यार्थिनींच्या कलागुणांना दाद मिळाली.

मैदानी स्पर्धांना प्रतिसाद
मंगळवारी सकाळच्या सत्रात स्थानिक क्रीडांगणावर आयोजित मैदानी स्पर्धांचे उद्घाटन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी यांनी केले. शंभर मीटर धावणे, गोळाफेक, भालाफेक अशा विविध क्रीडाप्रकारांचा या स्पर्धांमध्ये समावेश होता. महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, शिस्त व क्रीडावृत्ती पाहून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. विजेत्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

पद्म गॅलरीचे उद्घाटन
कार्यक्रमादरम्यान पद्म आर्ट गॅलरीचे उद्घाटनही मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. या गॅलरीमध्ये चित्रकला, शिल्पकला व हस्तकलेचे सुंदर व सृजनशील नमुने प्रदर्शित करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा तसेच कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने गॅलरीची स्थापना करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्यक्रमात कलागुणांची उधळण
दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सदस्या विना राधेश्याम लाहोटी यांनी केले. यावेळी मंचावर ममता जैन, प्रीती नहार, सीमा अग्रवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन धांडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.वसंत खरे, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.जे.व्ही.धनवीज, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.एस.टी.गावंडे, स्नेहसंमेलन सचिव धनश्री भालेराव, हितांशी दांडवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात नटराजाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकल नृत्य व सामूहिक नृत्यांचे बहारदार सादरीकरण केले. साऊथ इंडियन गीते, हिंदी चित्रपटांतील लोकप्रिय गीते तसेच मराठी गीतांवर विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी जल्लोष करत टाळ्यांच्या गजरात कलाकारांना प्रोत्साहन दिले.

याच सत्रात गीत गायन स्पर्धा व फॅन्सी ड्रेस स्पर्धाही पार पडल्या. दोन्ही स्पर्धांना विद्यार्थिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध वेशभूषा, सादरीकरणातील आत्मविश्वास व कला कौशल्यामुळे कार्यक्रम अधिकच लक्षवेधी ठरला.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मान्यवरांनी आपल्या भाषणातून क्रीडा, कला व संस्कृती या तिन्ही घटकांचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता व संघभावना वाढीस लागते, असे मत त्यांनी व्यक्त केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !