नऊ हजारांची लाच भोवली : धुळे जात पडताळणी कार्यालयातील कनिष्ठ लिपिकासह प्रकल्प सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
धुळे (19 जानेवारी 2026) : ओबीसी जात प्रमाणपत्राची पडताळणी करून देण्यासाठी नऊ हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धुळे जात पडताळणी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक प्रमोद पाटील व प्रकल्प सहाय्यक इम्रान अन्सारी यांना धुळे एसीबीने सोमवार, 19 रोजी सायंकाळी अटक केल्याने लाचखोर हादरले आहेत. धुळे एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराच्या शालकाचे ओबीसी जातीचे प्रमाणपत्र पडताळणी करून मिळण्यासाठी 21 रोजी जून 2025 रोजी ऑनलाईन मूळ अर्ज व आवश्यक कागदपत्र संबंधित कार्यालयाकडे जमा करण्यात आले होते. तक्रारदाराने प्रमाणपत्र मिळण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र प्रकल्प सहाय्यक इम्रान अन्सारी याने जात पडताळणीचे काम करून देण्यासाठी 12 हजारांची लाच मागून सुरुवातीला तीन हजार रुपये फोन पे द्वारा स्वीकारले मात्र दोन महिने होवूनही काम न झाल्याने तक्रारदाराने संपर्क साधला असता नऊ हजार रुपये लाच दिल्याशिवाय काम होणार नाही, असे सांगितल्याने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. कनिष्ठ लिपिक प्रमोद पाटील यांनी लाच मागणीला प्रोत्साहन दिले. सोमवारी सायंकाळी कार्यालयात लाच स्वीकारताच संशयीतांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, कॉन्स्टेबल मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, हवालदार सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
लाचखोर हादरले : नवीन वर्षात चार कारवायांचा धडाका
धुळे एसीबीने लाचखोरांविरोधात मोहिम तीव्र केली आहे. नववर्षाच्या सुरूवातीला तब्बल चार बड्या कारवाया एसीबीने लाचखोरांविरोधात केल्याने लाचखोर भीतीच्या सावटाखाली आहेत. शासकीय करून देण्यासाठी कुणीही लाच मागत अथवा घेत असल्यास एसीबीकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे (मो.94037-47157) यांनी केले आहे.







