!-- afp header code starts here -->

भुसावळ पालिकेतील विषय समित्यांवर भाजपचे वर्चस्व ; ‘या’ पदाधिकार्‍यांना मिळाली सभापतीपदाची संधी

पहिल्याच सभेत तणाव : स्थायी व विषय समित्यांचे गठन ; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सभात्याग


BJP gains dominance over the subject committees in the Bhusawal Municipal Council; ‘These’ office-bearers got the opportunity to become chairpersons. भुसावळ (19 जानेवारी 2026) : भुसावह पालिकेची विषय व स्थायी समिती निवडीची पहिलीच झालेली सभा गदारोळात पार पडली. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार सोमवार, 19 ोजी झालेल्या सभेत विविध विषय समित्यांचे सभापती आणि सदस्यांची निवड निश्चित झाली मात्र सभेच्या सुरुवातीलाच आणि त्यानंतर झालेल्या घडामोडींमुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, गटनेते सचिन चौधरी व त्यांच्या गटातील बहुतांश नगरसेवकांनी सभा अर्धवट सोडून सभात्याग केल्याने राजकीय वाद अधिक चिघळला. दरम्यान, शहरातील सत्ताधारी विरोधातील भाजपा असा संघर्ष शहरात पेटला असून आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र वळणावर जाण्याचे संकेत असल्याने त्याचा फटका शहरातील अमृत योजनेसह शहर विकासाला बसण्याची शक्यता नाकारताय येत नाही.

सभा बरखास्तीची गटनेत्यांची मागणी
सभेच्या प्रारंभीच राष्ट्रवादी गटनेते सचिन चौधरी यांनी काही नगरसेवक अद्याप कोणत्याही गटात सामील नसल्याने सभा अवैध असल्याचा दावा करत उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे सभा बरखास्त करण्याचे निवेदन सादर केले मात्र जिल्हाधिकारी यांचा स्पष्ट आदेश असल्याने सभा बरखास्त करता येणार नसल्याचे उपविभागीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. भुसावळ नगरपरिषदेची एकूण सदस्य संख्या 51 असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तीन गटांची अधिकृत नोंद झाली आहे. यामध्ये भाजप (गटनेते युवराज लोणारी), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट (गटनेते सचिन चौधरी) आणि शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व अपक्ष यांचा संयुक्त तिसरा गट (गटनेते बबलू बर्‍हाटे) यांचा समावेश आहे. सभेदरम्यान राष्ट्रवादीचे नगरसेवक उल्हास पगारे यांनी काही नगरसेवक गटाबाहेर असल्याने सभा तहकूब करण्याची मागणी केली. याला प्रत्युत्तर देताना भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आणि कायद्याच्या चौकटीतच सभा घेतली जात असल्याचे सांगितले तसेच गटाबाहेरील नगरसेवकांना तिन्ही गटांमध्ये सामील करून घेता येईल, अशी भूमिका मांडली. उपविभागीय अधिकार्‍यांनीही सभा नियमानुसार घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करत तहकूब करण्याची मागणी फेटाळली.

सत्ताधार्‍यांनी सोडले सभागृह
यानंतर स्थायी समिती व विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांच्या निवडीसाठी प्रस्ताव मांडण्यात आले मात्र प्रस्ताव मांडल्यानंतर लगेचच नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, गटनेते सचिन चौधरी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील बहुतांश नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर पडत सभात्याग केला आणि थेट नगरपरिषद कार्यालयात जाऊन बसणे पसंत केले.

स्थायी समिती सभापती नगराध्यक्षा गायत्री भंगाळे
सभात्यागानंतर उर्वरित उपस्थित नगरसेवकांच्या उपस्थितीत पिठासीन अधिकार्‍यांनी स्थायी समिती व विषय समित्यांच्या निवडी निश्चित केल्या. स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापतीपदी नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांची तर नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी परंपरेनुसार उपनगराध्यक्ष शैलेजा नारखेडे यांची निवड करण्यात आली.

स्थायी समितीचे सदस्य म्हणून विविध विषय समित्यांचे सभापती तसेच किरण कोलते, गिरीश महाजन आणि सचिन चौधरी यांची नावे निश्चित झाली.

विविध समित्यांवर भाजपाचे वर्चस्व
सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी अनिता सपकाळे, शिक्षण समितीच्या सभापतीपदी राजेंद्र आवटे, स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी मेघा देवेंद्र वाणी, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी महिमा अजय नागराणी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शोभा रणधीर इंगळे यांची निवड करण्यात आली.

यांची विचार मंचावर उपस्थिती
सभेचे सूत्रसंचालन मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी केले. विचार मंचावर नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, उपाध्यक्षा शैलेजा नारखेडे, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी राजेंद्र फातले आणि उपमुख्याधिकारी परवेझ अहमद उपस्थित होते.

सभेला भाजपचे सर्व नगरसेवक, बबलू बर्‍हाटे गटाचे सर्व नगरसेवक तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटातील बहुतांश नगरसेवक उपस्थित होते मात्र नवनिर्वाचित नगरसेवक तथा माजी आमदार संतोष चौधरी अनुपस्थित होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कोणत्याही विषय समितीच्या सभापती पदासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला नाही.

भुसावळ नगरपरिषदेच्या पहिल्याच सभेत समित्यांचे गठन होत असताना झालेला हा राजकीय वाद आणि सभात्याग शहरातील आगामी राजकारण अधिक तापविण्याची चिन्हे दर्शवत असून, पुढील काळात सत्ताधारी व विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !