भुसावळातील प्रांताधिकार्यांच्या दालनातील आंदोलन म्हणजे दबावतंत्र ; पालिका स्थलांतरावर यूटर्न
राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेतील सूर : गत नऊ वर्षात झालेल्या कामांचे ऑडीट होणार असल्याची पदाधिकार्यांची माहिती !
भुसावळ (20 जानेवारी 2026) : भुसावळ पालिकेचे श्री संत गाडगेबाबा रुग्णालयात स्थलांतर करण्याच्या निर्णयानंतर पेटलेल्या वादात सोमवारी भाजपाने प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करीत जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली. यानंतर पालिका रुग्णालयात सुरू असलेले तोडफोडचे काम तात्पुरता थांबवण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकार्यांनी शासकीय विश्रामगृहात मंगळवारी दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद घेतली. पालिकेचे स्थलांतर निश्चितच होईल मात्र त्यासाठी ठरावदेखील करू, असे सांगून पदाधिकारी म्हणाले की, ज्या पद्धत्तीने आंदोलन करण्यात आले तो म्हणजे अधिकार्यांवर टाकण्यात आलेला दबाव होता व अशा प्रकारे आंदोलन करणार्यांवर आता गुन्हे दाखल करायला हवेत. गेल्या नऊ वर्षात शहरात झालेल्या प्रत्येक कामांचे आता ऑडीट होईल, असेदेखील पदाधिकारी म्हणाले.
नऊ वर्षात झालेल्या कामांचे ऑडीट होणार
राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी सांगितले की, गत चार वर्ष पालिकेवर प्रशासकराज होते व त्यापूर्वी पाच वर्ष भाजपाची सत्ता होती त्यामुळे कोणता रस्ता झाला, कुठे गटार झाली? याबाबत ऑडीटद्वारे ‘दुध का दुध, पाणी का पाणी’ होणार आहे. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वात शहरात विकासाची कामे सुरू आहेत.

तर खुर्ची फेको आंदोलन करणार
अनुप खोब्रागडे म्हणाले की, भाजपा पदाधिकार्यांनी प्रांत अधिकार्यांच्या दालनात आंदोलन करून टेबल वाजवले हा अधिकार्यांचा अवमान आहे. अशा पद्धत्तीने अवमान करणार्यांवर गुन्हे दाखल करायला हवेत, आता तसे न घडल्यास भविष्यात अन्य नागरिकही अशी आंदोलन करतील व त्यावेळी दुजाभाव करून गुन्हे दाखल झाल्यास आम्ही अधिकार्यांची खुर्ची बाहेर फेकू.
जनतेच्या कामातून मिळाली उपाधी
माजी नगरसेवक रवी सपकाळे म्हणाले की, युवराज लोणारी हे माजी आमदार चौधरी यांच्यासोबत असतानाच त्यांना शिल्पकार म्हणत होते. ही उपाधी त्यांना जनतेचे केलेल्या कामातून मिळाली आहे.
आंदोलन नव्हे हा तर धिंगाणा
जयंत लोणारी म्हणाले की, प्रांताधिकारी कार्यालयात आंदोलन नव्हे तर धिंगाणा घालण्यात आला. नऊ वर्षात काय कामे केली हे त्यांनी सांगावे. पालिका रुग्णालयात मेन्टेनन्सची कामे सुरू आहेत त्याबाबत मुख्याधिकार्यांचे आदेश आहेत. अधिकार्यांचा टेबल वाजवणे व त्यांना धमकावणे आम्ही खपवून घेणार नाही.
पराभव मान्य नाही
माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर म्हणाले की, प्रांतांच्या दालनात टेबलावर हात टेकून केलेले आंदोलन चुकीचे आहे. पराभव त्यांना मान्य होत नाही. विरोधकांच्या आरोपांना आम्ही विकासकामातून उत्तर देणार आहोत.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर, माजी नगरसेवक रवी सपकाळे, अनुप खोब्रागडे, तालुकाध्यक्ष विशाल नारखेडे, जयंत लोणारी, शहराध्यक्ष अश्रफ खान, प्रकाश कोळी (खन्ना), प्रा.उत्तम सुरवाडे व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







