भुसावळातील राजकीय कलगीतुर्यानंतर मुख्याधिकारी महिनाभर रजेवर ! विकासकामांना ‘ब्रेक’ लागण्याची चिन्हे
गणेश वाघ
Following the political tussle in Bhusawal, the chief officer has gone on leave for a month! There are signs that development work will come to a halt भुसावळ (20 जानेवारी 2026) : भुसावळ पालिकेत सत्तापरिवर्तन झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी पहायला मिळत असून या सर्व प्रकारात मात्र शहर विकासापासून कुठेतरी दूर जात असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे. सर्वसामान्य नागरिकांना शहराच्या वा नेत्यांच्या राजकारणात रस नाही. त्यांना खरे तर चांगले रस्ते, पथदिवे, स्वच्छता व नियमित पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा आहे मात्र शहरातील एकूण राजकीय चित्र पाहता आगामी काळातही काही परिस्थितीत बदल होईल, याची सुतराम शक्यता नाही. अलीकडेच अमृत योजनेच्या जलकुंभाच्या कामाला लागलेल्या ब्रेकनंतर पालिका स्थलांतरावरुन उठलेले रान पाहता मुख्याधिकारी राजेंद्र फातले आजपासून महिनाभर रजेवर गेले आहेत. मुख्याधिकारी रजेवर गेल्याने शहराच्या कारभारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
शेंदुर्णी सीओ पाहणार कारभार
खास सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी 20 जानेवारी ते 18 फेब्रुवारीदरम्यान एका महिन्यांची रजा घेतली आहे. त्यांनी रजा घेण्यामागील स्पष्ट कारण समोर आलेनसलेतरी शहरात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नसती डोकेदुखी नको म्हणून ते रजेवर गेल्याची माहिती आहे. सीओ महिनाभर नसल्याने साहजिक नागरिकांची कामे खोळंबणार आहेत शिवाय शहराच्या विकासाला ब्रेक लागण्याची भीती आहे. फातले यांच्या जागेवर शेंदुर्णी सीओ विवेक धांडे हे भुसावळचा पदभार पाहतील मात्र धांडे यांना दररोज भुसावळात येणे शक्य नाही त्यामुळे त्याचा साहजिकच फटका पालिकेच्या विकासकामांवर होण्याची भीती आहे.

सत्ताधारी-विरोधकांच्या वादात भरकटू नये शहराचा विकास
शहरात पालिकेतील राष्ट्रवादी सत्ताधारी व भाजपा विरोधकांमध्ये पालिका स्थलांवरून चांगलाच वाद पेटला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून सुरू झालेला वाद जिल्हाधिकार्यांपर्यंत पोहोचल्यानंतर तूर्त स्थलांतराला ब्रेक लागला मात्र सत्ताधारी व विरोधकांमध्ये रंगलेल्या कलगीतुर्यामुळे शहराच्या विकासाला ब्रेक लागू नये ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. मुख्याधिकारी रजेवर गेल्यानंतर ते पुन्हा शहरात परततात की थेट बदलीच करून घेतात? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.







