भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त भित्तीपत्रिकेचे उद्घाटन
A wall magazine was inaugurated at P.K. Kotecha Women’s College in Bhusawal as part of the Marathi Language Promotion Fortnight भुसावळ (21 जानेवारी 2026) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त भित्तिपत्रिका उद्घाटन व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भित्तिपत्रिकेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन धांडे यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.किरण वारके उपस्थित होते.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी मराठीतील प्रसिद्ध कवींच्या कवितांचे सुबक हस्तलेखन करून भित्तिपत्रिकेची आकर्षक सजावट व सुशोभीकरण केले. मराठी भाषेप्रती असलेली विद्यार्थिनींची आत्मीयता व सर्जनशीलता या भित्तिपत्रिकेतून प्रभावीपणे व्यक्त झाली.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.जीवन धांडे यांनी सांगितले की, मराठी भाषा ही आपली सांस्कृतिक ओळख आहे. विद्यार्थिनींनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचा दैनंदिन व्यवहारात अधिकाधिक वापर करावा. अशा उपक्रमांमधून भाषेचे संवर्धन घडते. सर्जनशील लेखन, वाचन आणि चिंतन यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते.
सूत्रसंचालन ऐश्वर्या जवरे हिने केले, तर आभार प्रदर्शन जयश्री तायडे या विद्यार्थिनीने केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा.निलेश गुरचळ, गिरीश कोळी, गिरीश सरोदे, रविकांत वासनिक, पंकज पालक तसेच प्रा. मुक्ती जैन आदी उपस्थित होते.
मराठी विभागातील प्रा.भावना संकोपाळ व प्रा.विनोद भालेराव यांनी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. मोठ्या संख्येने विद्यार्थिनी या उपस्थित होत्या.







