भुसावळ तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार कमिशनपासून वंचित !


भुसावळ (21 जानेवारी 2026) : भुसावळ तालुक्यातील रेशन दुकानदार बांधव सध्या आर्थिक चणचणींना तोंड देत आहेत. धान्य दुकानदारांना अद्याप शासनाकडून कमिशन मिळाले नसल्याने त्यांना कमिशन मिळण्याची प्रतीक्षा आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोणताही खंड पडू न देता मोफत धान्याचे वेळेत वाटप करून शिधापत्रिका धारकांची सोय करणारे रास्त धान्य दुकानदारांना गेल्या सात महिन्यांपासून त्यांच्या हक्काचे कमिशन मिळालेले नाही.





याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता संबंधित अधिकारी अनुदान नसल्याचे कारण पुढे करत आहेत. जनसामान्यांना रास्त दरात अन्नधान्य उपलब्ध व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शासनमान्य रास्त धान्य दुकानांमधून तांदूळ, गहू, साखर व डाळीच्या उपलब्धतेनुसार वाटप केले जाते. सध्या शासनच हे धान्य दुकानापर्यंत पोहोच करीत असून त्याचे वाटप दुकानदार करीत आहे.

या कामासाठी शासनाकडून या रेशन दुकानदारांना कमिशन देण्यात येते. या कमिशनमधून दुकानदार धान्यवाटप व ईपॉस मशीनवर अंगठे व अन्नप्रक्रिया करण्यासाठी ठेवलेले कामगार यांचा पगार देऊन उरलेल्या पैशातून आपला उदरनिर्वाह चालवतात.

सध्या धान्य वाटपाचा कारभार ऑनलाईन आहे मात्र असे असताना याच रेशन दुकानदारांना त्यांच्या हक्काचे कमिशन वेळेत मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

काही दिवसांपूर्वी मे व जून महिन्याचे कमिशन मिळाले असून जुलै महिन्यापासून ते जानेवारी महिन्यापर्यंतचे कमिशन मिळालेले नाही या संपूर्ण परिस्थितीत कामगारांचा पगार दुकानाचे भाडे लाईट बिल व अन्य खर्च भागवायचा कसा? असा गंभीर प्रश्न भुसावळ राशन दुकानदार यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन थकीत कमिशन तत्काळ मिळावे अशी मागणी दुकानदार बांधवांकडून होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !