भुसावळात मनसेच्या पावित्र्यानंतर प्रभाग आठमध्ये झाली स्वच्छता
Following MNS’s initiative in Bhusawal, cleanliness drive was carried out in ward number eight. भुसावळ (24 जानेवारी 2026) : शहरातील मोहित नगर आणि रिंग रोड परिसरात साचलेल्या कचर्याच्या ढिगार्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या समस्येची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भुसावळ शहर अध्यक्ष दीपक आत्माराम सोनवणे, तुषार वाढे, विलास कोळी, दशरथ सपकाळे, प्रणय भागवत, सुशील मोरे यांनी नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले. या निवेदनाची तातडीने दखल घेत नवनियुक्त नगराध्यक्षा माननीय गायत्री भंगाळे व मुख्याधिकारी यांनी परिसरात स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना दिलासा दिला.
नियमित स्वच्छतेची अपेक्षा
रिंग रोडवरील मेडिकल समोर आणि मोहित नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कचरा कुंडी नसल्याने कचर्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. दीपक सोनवणे यांनी या संदर्भात प्रत्यक्ष भेट देऊन ही समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि मुख्याधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने आरोग्य विभागाला सूचना दिल्या. त्यानुसार पालिकेच्या स्वच्छता पथकाने रिंग रोड व मोहित नगर परिसरातील विविध ठिकाणी साचलेला कचरा उचलून परिसर चकाचक केला आहे.
प्रशासनाच्या या जलद कार्यवाहीबद्दल मनसे शहर अध्यक्ष दीपक सोनवणे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांचे आभार मानले. शहराच्या स्वच्छतेसाठी भविष्यातही असेच सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

