‘पठाणकोट’ एक्स्प्रेसला दहा दिवसात थांबा द्या अन्यथा रेलरोको आंदोलन
निंभोरा गाव सेवा समितीचा डीआरएम यांना निवेदनातून ईशारा
Provide a stop for the ‘Pathankot’ Express within ten days, otherwise we will launch a rail blockade protest भुसावळ (24 जानेवारी 2026) : रावेर तालुक्यातील निंभोरा येथे पठाणकोट एक्सप्रेसला पूर्ववत थांबा मिळावा या मागणीकडे रेल्वे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष चालवले असल्याने निंभोरा व परिसर गाव सेवा समिती अत्यंत छुप्या पद्धतीने व गनिमी काव्याने तारीख न सांगता अचानक रेल रोको व जेलभरो आंदोलन करणार असल्याचा ईशारा समितीचे प्रमुख संयोजक विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
तर तीव्र आंदोलन
स्वातंत्र्योत्तर काळापासून सुरू असलेल्या पठाणकोटला निंभोरा रेल्वे स्टेशनवर असलेला थांबा कोरोनानंतर अचानक रद्द झाल्याने प्रभावित झालेल्या प्रवासी, व्यापारी व सर्वच घटकांनी एकत्र येऊन टप्प्याटप्याने आक्रोश आंदोलन चालवले असून गेल्या 3 जानेवारी रोजी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून निंभोरा रेल्वे स्टेशन भागात पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलनाची दिशा ठरवणारी एल्गार सभा घेण्यात आली होती. या सभेत ठरल्याप्रमाणे निंभोरा पंचक्रोशीतून पठाणकोठला थांबा मिळावा या मागणी निवेदनासाठी 5 हजार सह्यांची मोहीम सुद्धा दुसर्या टप्प्यात राबविण्यात आली होती. दरम्यान, एल्गार सभेला रेल्वेच्या गोपनीय विभागाच्या अधिकार्यांनी उपस्थित राहून आंदोलनाच्या मागणीबाबत सविस्तर अहवाल रेल्वे प्रशासनाला दिला होता. निंभोरा पोलिसांनी सुद्धा पोलीस खात्याच्या वरिष्ठ स्तरावर नियोजित आंदोलनाची माहिती पोहचवली असतांना मागणी मान्य न झाल्याने निंभोरा गाव व परिसर सेवा समिती गनिमी काव्याने तारीख जाहीर न करता अचानक आंदोलन करण्याच्या पावित्र्यात असल्याचे निवेदन डीआरएम यांना आज शनिवार, 24 जानेवारी रोजी समितीच्या वतीने देण्यात आले.
यावेळी पंचक्रोशीतील 5 हजार ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन डी.आर. एम.पुनीत अग्रवाल यांना सुपूर्द करण्यात आले.दरम्यान, निश्चितपणे पठाणकोटला थांबा मिळेल यासाठी आपला 5 हजार सह्यांचा मागणी प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन डीआरएम पुनीत अग्रवाल यांनी शिष्टमंडळाला दिले.
डीआरएम कार्यालयाबाहेर निदर्शने
डीआरएम यांची भेट घेऊन निवेदन देण्यापूर्वी समितीच्या वतीने लक्ष वेधण्यासाठी कार्यालयाबाहेर घोषणा देत निदर्शने करण्यात आले.निंभोरा येथे पठाणकोटला थांबा… मिळालाच पाहिजे.असे कसे थांबत नाही… थांबविल्याशिवाय राहणार नाही. आमची मागणी…पूर्ण करा,अशा घोषणा देत निंभोरा गाव सेवा समितीच्या वतीने झेंडे दाखवत हे निदर्शन करण्यात आले.
तोपर्यंत जामीन घेणार नाहीत…!
निंभोरा गाव सेवा समितीची थांब्याची मागणी दुर्लक्षित केल्यास पंचक्रोशीतील शेतकरी बैलगाडी, ट्रॅक्टर, आपल्या गायी-म्हशी व गुरे-ढोरांसह रेल्वे मार्गांवर उतरतील. ‘रेलरोको व जेलभरो’ आंदोलन उभारण्यात येईल. सर्व प्रभावित परिसरातील लोक स्वतः अटक करून घेतील आणि जोपर्यंत थांबा जाहीर होत नाही तोपर्यंत रेल्वे जेलमध्येच राहून जामीन घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांची राहणार असल्याचे विवेक ठाकरे यांनी निदर्शने करतांना स्पष्ट केले.
मोहन बोंडे, धनंजय ठाकरे, दीपक मोरे, विजय सोनार, धनश्री ठाकरे, दस्तगीर खाटीक, विनोद राठोड, ईश्वर कोळी, इम्रान शेख, गौरव रणदिवे, इरफान पटेल, प्रा.दिलीप सोनवणे, युनूस खान अमान खान, इम्रान पटेल, सचिन फेगडे, मुज्जफर पटेल, निलेश लोखंडे, तौकीर शेख, गौरव ठाकरे आदी उपस्थित होते.

