हज कमिटी सीईओ नियुक्ती रद्द करा : भुसावळातील काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मनोज जाधव यांची नियुक्ती संविधान, धर्मनिरपेक्षता,अल्पसंख्यक स्वायत्ततेवर आघात असल्याचा आरोप
Cancel the appointment of the Haj Committee CEO : Congress Minority Department in Bhusawal demands of the Chief Minister भुसावळ (24 जानेवारी 2026) : महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावर मनोज जाधव यांची करण्यात आलेली नियुक्ती तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांकक विभागाने केली. याबाबत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रांतांधिकारी यांना सुध्दा निवेदन देण्यात आले आहे.
काय आहेत मागण्या?
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य हज कमिटी ही सर्वसाधारण शासकीय संस्था नसून मुस्लिम समाजाच्या धार्मिक श्रद्धा, इबादत व मूलभूत अधिकारांशी थेट संबंधित असलेली वैधानिक संस्था आहे. अशा संवेदनशील पदावर कोणतीही खुली व पारदर्शक निवड प्रक्रिया न राबवता नियुक्ती करण्यात येणे हे केवळ प्रशासकीय निर्णय नसून संविधानाच्या धर्मनिरपेक्ष चौकटीवर आघात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पात्रतेचे निकष डावलले
हज कमिटीसारख्या धार्मिक संस्थेत सीईओ नियुक्त करताना जाहिरात न देता,पात्रतेचे निकष जाहीर न करता व संबंधित समुदायाशी सल्लामसलत न करता निर्णय घेण्यात आल्याचा दावा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाने केला आहे. अल्पसंख्यांक धार्मिक संस्थांच्या स्वायत्ततेचे दमन होत असून समुदायाच्या विश्वासाला तडा जात असल्याचेही निवेदनात नमूद आहे. या प्रकरणी सरकारने तत्काळ खुलासा करावा, निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी तसेच नव्याने नियुक्ती करताना खुली, पारदर्शक व पात्रतेवर आधारित प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव अॅड.प्रवीण सुरवाडे, प्रदेश उपाध्यक्ष मो.मुनव्वर खान, शहर अध्यक्ष अहमद इब्राहिम कुरैशी, इस्माईल पहलवान, महेबूब खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवेदन दिले.

