शरद पवार गटातील आमदारांचा पालकमंत्र्यांना टोला : तिजोरीच्या चाव्या आमच्या अजितदादांकडे
MLAs from Sharad Pawar’s group taunt the guardian ministers: The keys to the treasury are with our Ajit Dada सोलापूर (24 जानेवारी 2026) : राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या अजितदादांकडेच आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांनी भाजप आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर पलटवार केला आहे.
प्रचार शुभारंभप्रसंगी लगावला टोला
पंढरपूर आणि माढ्यामध्ये भाजपच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत आहेत. शनिवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांच्याहस्ते मेंढापूर येथील महादेव मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांनी भाजपला लक्ष्य केलं.
पालकमंत्री जरा सावध रहा
अभिजीत पाटील यांनी नुकतेच राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले कल्याणराव काळे आणि गणेश पाटील यांच्यावर टोलेबाजी करीत पालकमंत्री जरा सावध राहावा, असा इशाराही दिला. पालकमंत्री जयकुमार गोरे प्रत्येक सभेत यांना निवडून दिले तर निधी कसा आणणार आहेत? असा सवाल करीत असतात. त्यावर, आमदार अभिजीत पाटील यांनी उत्तर देताना दोन्ही राष्ट्रवादी एक असून राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या अजित दादांकडे आहेत हे लक्षात ठेवा, असे म्हटले.
एकंदर दोन राष्ट्रवादी एकत्र आल्याने विरोधात असणार्या शरद पवार गटाला आता सत्तेची ताकद मिळाल्याने थेट भाजपलाच आव्हान देण्याचे काम सुरू झाले आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेले कल्याणराव काळे यांच्यावर सडकून टीका करताना दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यावर यांनी आनंदाने एकत्र राहणे गरजेचे होते मात्र सत्ता आपल्या कुटुंबात राहावी यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मी सुटलो कारण काळे जिथे जातात तिथे पडतात आणि आता ते जिथे गेलेत त्यांना पाडणार हे नक्की असे म्हणत पालकमंत्री जरा सावध राहा, असा टोला अभिजीत पाटील यांनी लगावला. यावेळी, अभिजीत पाटील यांनी कल्याणराव काळे यांच्यावर रंडूका अशा शब्दात मिश्किल शेरेबाजी केली.

