भुजबळांच्या क्लीन चीटवर दमानियांचा संताप ; हायकोर्टात जाण्याचा निर्णय
Damanias express anger over Bhujbal’s clean chit; decide to approach the High Court मुंबई (24 जानेवारी 2026) : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंतर आता सक्तवसुली संचालनालयाच्या केसमध्येही मोठा दिलासा मिळाल्यानंतर या निर्णयावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया संतप्त झाल्या आहेत. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगत मुख्यमंत्री फडणवीस सगळ्या भ्रष्टाचारांना घेऊन पुढे जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
हायकोर्टात जाण्याचा इशारा
पत्रकार परिषदेत बोलताना अंजली दमानिया यांनी भुजबळांविरुद्धच्या कायदेशीर लढाईचा पाढा वाचला. त्या म्हणाल्या, 2014 साली मी छगन भुजबळांविरोधात जनहित याचिका दाखल केली. एकूण 11 घोटाळ्यांचा त्यात उल्लेख होता. त्यातून तीन गुन्हे दाखल झाले. त्यापैकी दोन प्रकरणांमध्ये दिलासा मिळाला असलातरी एक महत्त्वाचं प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. कोर्टासमोर संपूर्ण व योग्य माहिती मांडली गेली नाही, त्यामुळे असे निर्णय झाले असावेत.
कलिना सेंट्रल लायब्ररी प्रकरण अजून प्रलंबित
अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलं की, कलिना सेंट्रल लायब्ररी प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. या प्रकरणामुळे भुजबळ यांना अद्याप पूर्ण दिलासा मिळालेला नाही. या संपूर्ण प्रकरणावर मी मुख्य न्यायमूर्तींसह देशाचे सरन्यायाधीश आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
ठाकरे अन् फडणवीस सरकारांवर गंभीर आरोप
दमानिया यांनी यावेळी सत्ताधारी आणि माजी सरकारांवरही गंभीर आरोप केले. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळ यांना आधी उद्धव ठाकरे सरकारने वाचवलं आणि आता देवेंद्र फडणवीस सरकारने वाचवलं. एसीबीने या प्रकरणात अपील करणं अपेक्षित होते मात्र तसं झालं नाही. सगळे एका माळेचे मणी आहेत, असा आरोप त्यांनी केला.
त्यांनी सांगितलं की, 31 मार्च 2022 रोजी ठाकरे सरकारने अपील संदर्भातील शासन निर्णय रद्द केला होता. त्यानंतर एप्रिल 2023 मध्ये पुन्हा अपील करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला. तरीही महाराष्ट्र सदन घोटाळ्याचं प्रकरण पूर्णपणे संपलेलं नाही, असा दावा त्यांनी केला.
फडणवीस भ्रष्टाचार्यांना घेऊन पुढे जात आहेत
अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा नारा देणारे फडणवीस आज भ्रष्टाचार्यांना घेऊन पुढे जात आहेत. भाजपची हीच मोडस ऑपरेंडी आहे. आधी आरोप करा, तपास यंत्रणा लावा आणि नंतर त्यांनाच पक्षात सामावून घ्या, असा आरोप त्यांनी केला.

