न्यायालयात खटला प्रलंबित असतानांही सत्ताधार्यांकडून स्वागत कसे? : खासदार संजय राऊत
How can the ruling party welcome someone while a case against them is pending in court? : MP Sanjay Raut मुंबई (25 जानेवारी 2026) : शिवसेना कुणाची? हा खटला तीन वर्षांपासून देशाचे मुख्य न्यायधीश यांच्याकडे प्रलंबित असून ते स्वत: तारीख देतात आणि दोन महिन्यांनी तारीख पुढे ढकलतात. या काळात शिंदे गटाने घटनाबाह्य पद्धतीने चार निवडणूक लढवल्या आहेत. आता 21 तारखेचे तेच झाले. ते मुंबईत आले तर त्यांचे स्वागत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केले. त्यांचा खटला सुरू असलेले लोकं त्यांचे स्वागत करत आहेत हे संविधानाविरोधातील आहे, हे अनैतिक आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तर न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडून जाईल
संजय राऊत म्हणाले की, देशाच्या न्यायव्यवस्थेवर असलेला लोकांचा विश्वास उडून जाईल. का आम्हाला न्याय देण्यात येत नाही हे काल सिद्ध झाले आहे. ज्यांचा खटला सुरू आहे त्यांच्याकडून सत्कार कसा स्वीकारला जाऊ शकतो.
पाटण्यात महाराष्ट्र भवनसाठी जागा मागावी
संजय राऊत म्हणाले की, बिहारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी आव्हानाची भाषा केलेली आहे. संविधानानुसार हा देश सर्वांचा आहे. प्रत्येकाला देशामध्ये कुठेही फिरणे, राहणे नोकरी करणे हे सर्व अधिकार दिलेले आहे हे आम्हाला माहिती आहे. मुंबईमध्ये बिहार भवन त्यांना कशासाठी बांधायचे आहे. पाटण्याचा आणि बिहारचा विकास त्यांनी केला पाहिजे पण मुंबईत रोजगारासाठी येणार्या लोकांची संख्या जास्त झाल्याने त्यांना वाटते की इथे बिहार भवन उभारले पाहिजे.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे
इतर राज्याची भवने मुंबई, नवी मुंबईत आहेत. मुंबईत बिहार भवन उभारण्यासाठी सरकारला त्यांना जागा द्यावी लागेल ना ती काही पाटण्याहून ते आणणार नाही. त्यासाठी सर्वपक्षांची एक बैठक घ्यावी लागेल, त्यात मुख्यमंत्र्यांनी सांगावे की मुंबईत बिहारभवनसाठी जागा देत आहोत. या बदल्यात त्यांनी बिहार सरकारकडे पाटण्यात 5 एकर जागा द्यावी तिथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी मागणी करावी. मुंबईत जागा हवी असेल तर बाजारभावाने जागा घ्यावी जर सरकारकडून हवी असेल तर पाटण्यात महाराष्ट्र भवनसाठी जागा देण्यात यावी.
मराठी माणसांचा अपमान करू नका
संजय राऊत म्हणाले की, मुंबईची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. उगाच परिस्थिती बिघडेल अशी वक्तव्य कोणीही करू नये. गुलाबराव पाटील हे नकली शिवसेनेचे मंत्री आहेत त्यामुळे ते मराठी तरुणांबद्दल चुकीची भाषा वापरत आहेत. महाराष्ट्र जो घडवला आहे तो श्रमिक मराठी माणसांनी घडवला आहे. आज मुंबईमध्ये मराठी माणसाने बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे मतदान केले आहे. आपल्या घामातून आणि रक्तातून त्यांनी मुंबई घडवली आहे. पण हे सर्वच नकली असल्याने त्याचे विचार सुद्धा नकली आहे. त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आहेत. त्यांच्या पक्षाच्या राज्याचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांना मराठी तरुण आळशी आहे, काम करत नाही हे मान्य आहे का? हे त्यांनी सांगावे मग आम्ही उत्तर देऊ. मराठी माणसांचा अपमान करू नका.

