नाथाभाऊ स्पष्टच म्हणाले, होय, मुक्ताईनगरात भाजपाला मदत केली, मी अनेकांना त्रास दिला पण….


जळगाव (24 जानेवारी 2026) : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदावर भाजपा उमेदवाराचा पराभव झाला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी मदत केल्याचा आरोप होता व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील याबाबत सुतोवाच केले. या वक्तव्यावर नाथाभाऊंनी ’खरं बोलायला काय हरकत आहे? होय, मी भाजपला मदत केली’ असे म्हणत स्थानिक गणिते वेगळी असल्याचे स्पष्ट केले.

काय म्हणाले पालकमंत्री ?
गुलाबराव पाटील यांनी एका सभेत दावा केला होता की, नाथाभाऊंनी मला खूप त्रास दिला, त्याचीच फळं ते आता भोगत आहेत. यावर पलटवार करताना खडसे म्हणाले, मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं आहे, पण तो त्रास केवळ भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांना आणि गुंडांना दिला आहे. अशा लोकांना जेलमध्ये टाकण्याचे काम मी केले आहे आणि पुढेही करत राहीन. गुलाबराव पाटील विसरले असावेत की त्यांच्या आमदारकीच्या काळात मी त्यांना मोठी मदत केली होती. ते अजून राजकीयदृष्ट्या खूप लहान आहेत.

एकनाथ खडसेंची स्पष्ट कबुली
मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्य लढत झाली होती. यावेळी राष्ट्रवादीचे नेतृत्व करत असूनही खडसेंनी भाजपचा छुपा प्रचार केल्याची चर्चा होती. गुलाबराव पाटलांनी हा मुद्दा लावून धरला असता, खडसे यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. गुलाबराव एवढी वर्षे मंत्री आहेत, पण ते आपल्या गावची नगरपरिषद निवडून आणू शकले नाहीत, त्यांनी आधी आत्मचिंतन करावे. आणि हो, मी मुक्ताईनगरमध्ये भाजपला मदत केली, हे सत्य स्वीकारायला मला कोणतीही अडचण नाही, असे खडसे म्हणाले.

वरणगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार
एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्यातील हा वाद सुरू असतानाच, गुलाबराव पाटलांनी खडसेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का दिला आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !