!-- afp header code starts here -->

भुसावळातील रेल्वे कर्मचार्‍याचा मृत्यू


Railway employee dies in Bhusawal भुसावळ (26 जानेवारी 2026) : रेल्वे विभागाच्या प्रशिक्षणादरम्यान आजारी पडलेल्या 32 वर्षीय कर्मचार्‍याचा मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. योगेश बबनराव नागवे (वय 32, रा. शिव सोसायटी प्लॉट, पनवेल, नवी मुंबई) असे मृत कर्मचार्‍याचे नाव आहे.

उपचारादरम्यान ओढवला मृत्यू
योगेश नागवे हे रेल्वे विभागात कार्यरत होते. त्यांचे 11 ऑगस्ट 2025 ते 8 जानेवारी 2026 या कालावधीत भुसावळ येथे प्रशिक्षण सुरू होते. या प्रशिक्षणादरम्यान 2 जानेवारी 2026 रोजी त्यांना तसेच इतर सुमारे 150 कर्मचार्‍यांना विषबाधेमुळे उलट्यांचा त्रास झाला होता. त्यानंतर नागवे यांच्यावर भुसावळ येथील रेल्वे रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर ते घरी परतले मात्र 12 जानेवारी 2026 रोजी पुन्हा उलट्यांचा त्रास वाढल्याने त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रकृती अधिक खालावल्याने पुढील उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.35 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद प्रथम मुंबईतील आग्रीपाडा पोलिसात करण्यात आली. संबंधित कागदपत्रे 24 जानेवारी 2026 रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवाल राखीव ठेवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार युनुस शेख करीत आहेत.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !