अखेरच्या क्षणापर्यंत अजित दादा कामात व्यस्त
मुंबई (29 जानेवारी 2026) : नेहमी भल्या सकाळी कामाला सुरुवात करण्याचा पायंडा असलेले अजितदादा पवार आपल्यातून निघून गेल्यावर विश्वासच बसत नाही. नेहमी शासकीय बैठकांमध्ये, राजकीय कार्यक्रमात आणि लोकांच्या गराड्यात राहणारे अजित पवार बुधवारी हे सगळे सोडून निघून गेले मात्र अजित पवारांच्या निधनापर्यंतही ते आपल्या कामात व्यस्त असल्याचे दिसून आले. निधनाच्या दिवसाची सकाळ आणि त्याआधीचा संपूर्ण दिवस अजित पवार कामात व्यस्त होते.
आदल्या दिवशी मंत्रालयात बैठक
निधनाच्या एक दिवस आधी मंगळवारीही अजित पवार नऊ वाजताच मंत्रालयात आले होते. सकाळी 9 ते 9.30 पर्यंत त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभाग आणि मुंबई पोलीस अधिकार्यांकडून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. अर्थसंकल्प जवळ आल्याने त्यांनी 9.30 वाजता नियोजित बैठक घेतली. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी पक्षाच्या मंत्र्यांबरोबर 11:30 वाजता त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीपूर्व चर्चा केली. अनेक मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर होते मात्र प्रशासकीय कामाला महत्त्व देणारे अजित पवार उपस्थित राहिले. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीतही ते सहभागी झाले होते.
निवडणूक प्रचारासाठी घेणार होते चार सभा
अजित पवार दर मंगळवारी आपल्या मंत्री आणि आमदारांची ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी बैठक घेत असत. मंत्रालयातील बैठका आटोपून देवगिरीवर परतलेल्या अजित पवारांनी त्यानंतर नेहमीप्रमाणे मंत्री आणि आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी पक्षाची तयारी आणि इतर बाबींचा आढावा घेतला.
ही बैठक संपवून रात्री ते मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी गेले. तिथे राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिकेत भाजप आणि अजित पवार गट कुठे एकत्र येऊ शकतो याबाबत चर्चा करण्यात आल्याचे समजते. रात्री ही बैठक आटोपून अजित पवार देवगिरीवर परतले. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून ते बारामतीकडे जायला तयार झाले. बारामतीच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी अजित पवारांच्या निरावागज, पणदरे, करंजेपूल आणि सुपा अशा चार सभा होणार होत्या.
वातावरणाचा अंदाज घेऊन अजित पवार निघाले होते
विमानाने सकाळी लवकर बारामतीला निघायचे होते. राज्यात थंडी वाढल्याने सकाळी बहुतांश भागात धुके असते त्यामुळे विमान उतरण्यासाठी बारामतीतील वातावरण कसे आहे याची माहिती घेण्यात आली. वातावरण चांगले असल्याचा निरोप आल्यानंतर 7फ30 वाजता अजित पवार देवगिरीवरून विमानतळाकडे जायला निघाले. निघताना त्यांनी महत्त्वाची कागदपत्रे आणि काही निवेदनेही आपल्यासोबत घेतली होती.
