साकरीतील अल्पवयीन मुलींची हत्या करणार्‍या नराधमांना द्यावी कठोर शिक्षा

भुसावळात महिला, सामाजिक संघटनासह राजकीय पदाधिकार्‍यांतर्फे प्रांताधिकार्‍यांना निवेदन


The perpetrators who murdered the minor girls in Sakri should be given a harsh punishment भुसावळ (29 जानेवारी 2026) : अल्पवयीन दोन शाळकरी मुलींची साकरीत विहिरीत ढकलून हत्या करण्यात आली होती. ही घटना मंगळवारी घडल्यानंतर सर्वत्र नागरिकांमधून रोष वाढला असून नराधम आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. विविध महिला संघटना, सामाजिक संस्था व राजकीय पदाधिकार्‍यांकडून राष्ट्रपती, मुख्यमंत्री, प्रांत अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच पोलिस प्रशासनाकडे स्वतंत्र व एकत्रित स्वरूपात निवेदने देण्यात आली व आरोपींवर कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

घटनेचा सर्व स्तरावरून निषेध
मंगळवार, 27 जानेवारी रोजी साकरी येथे घडलेली ही घटना अत्यंत अमानुष, क्रूर व समाजाला हादरवून टाकणारी असल्याचे निवेदनांत नमूद आहे. निष्पाप अल्पवयीन मुलींना जाणीवपूर्वक विहिरीत ढकलून त्यांचा जीव घेतल्याची ही घटना केवळ गुन्हा नसून मानवतेवर झालेला आघात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या घटनेमुळे महिलांमध्ये, मुलींमध्ये व पालकांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील गांधी पुतळ्याजवळ महिला जमा होऊन तेथून महिला प्रांत कार्यालयात जाऊन प्रांताधिकारी यांना निवेदन सादर केले.

सज्ञान आरोपींप्रमाणे व्हावी कारवाई
महिला मंडळांतर्फे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महिलांवरील व मुलींवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.अशा गुन्ह्यांमध्ये जर कठोर शिक्षा झाली नाही तर भविष्यात विकृत प्रवृत्तीला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळेल,असा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनांमधून संबंधित संशयीत अल्पवयीन असले, तरी त्यांनी केलेल्या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता त्यांच्यावर सज्ञान आरोपीप्रमाणे कठोर, निष्पक्ष व कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल आणि महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ होईल,असेही नमूद करण्यात आले आहे. राजकीय व सामाजिक पदाधिकार्‍यांनी पोलिस प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनात या प्रकरणात कसलीही ढिलाई न करता सखोल तपास करावा, दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी तसेच पीडित कुटुंबाला शासनाकडून सर्वोतोपरी मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली. साकरीतील या घटनेमुळे तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोषींना कठोर शिक्षा मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार निवेदन देणार्‍यांनी व्यक्त केला आहे.

यांनी दिले निवेदन
यावेळी सकल लेवा महिला मंडळातर्फे नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, अध्यक्षा मंगला पाटील, वैशाली धांडे, मनिषा पाटील, मेघा कुरकुरे, वैशाली चौधरी, सोनल महाजन तसेच भाजपचे उत्तर विभागाचे शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, सरचिटणीस पवन बुंदेले, नगरसेवक किरण कोलते, दीपक धांडे आदी उपस्थित होते, त्यांनीही निवेदन दिले.

प्रतिष्ठा महिला मंडळाचेही निवेदन
प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे सुध्दा निवेदन देण्यात आले. गांधी पुतळ्यापासून निवेदन देण्यासाठी महिला प्रांताधिकारी कार्यालयात गेल्या होत्या. यावेळी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल, नगरसेविका शारदा धांडे, दीपाली बर्‍हाटे आदी सदस्य उपस्थित होत्या. यावेळी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या महिला सदस्यांनी डीवायएसी कार्यालयात जाऊन डीवायएसपी यांना निवेदन देत चर्चा केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !