!-- afp header code starts here -->

आमदार रोहित पवार स्पष्टच म्हणाले ; पवार कुटूंब एकत्र येण्याची वेळ !


MLA Rohit Pawar clearly stated; it’s time for the Pawar family to come together बारामती (7 फेब्रुवारी 2026) : सगळ्या पवार कुटुंबाने एकत्र यावे, ही अजितदादांची मनापासूनची इच्छा होती. अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही मात्र एक परिवार म्हणून मला सुनेत्रा काकींमध्ये अजितदादांचेच प्रतिबिंब दिसते, असते असे आमदार रोहित पवार म्हणाले. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदासह अजितदादांकडील सर्व खाती मिळावीत, ही त्यांची इच्छा होती आणि आता त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात, अशी भूमिका आमदार रोहित यांनी मांडली.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही दादांची इच्छा
बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी पवार कुटुंबाच्या एकजुटीबाबत आणि सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण विधान केले. रोहित पवारांनी सांगितले की, अजितदादांचे स्वप्न हे पवार कुटुंब एकत्र राहावे, असेच होते. या दिशेने दादांकडून प्रयत्न सुरू होते. सुप्रिया ताई, पवार साहेब आणि आम्ही सर्वजणही तसाच प्रयत्न करत होतो, असे त्यांनी नमूद केले. दुर्दैवी घटनेनंतर गेल्या 13 दिवसांत कुटुंब एकत्र असल्याचेही त्यांनी सांगितले. कुठलाही पूर्वनियोजित कार्यक्रम नसताना काटेवाडीत श्रीनिवास पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र मतदानासाठी आले, हे त्या एकजुटीचे उदाहरण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

पवार साहेबांनी (शरद पवार) अलीकडेच जय पवार आणि कुटुंबातील इतर सदस्यांना मार्गदर्शन केल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले. हे मार्गदर्शन भावनिक स्वरूपाचे होते आणि अजितदादांच्या स्मरणार्थ काही गोष्टी पुढील काळात करण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पवार साहेबांच्या मनात एखादी गोष्ट आली की, ते आम्हाला बोलावून मार्गदर्शन करतात, असे ते म्हणाले.

या संवादादरम्यान सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर रोहित पवार यांनी भाष्य करण्याचे टाळले. मात्र, त्यांनी दोन महत्त्वाच्या तारखा जाहीर करत सूचक संकेत दिले. 10 फेब्रुवारीला मी अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातील काही शंका मांडणार आहे. त्यानंतर 12 फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत काय ठरले होते, हे सविस्तर सांगणार आहे, असे त्यांनी जाहीर केले.

पवार कुटुंबाच्या एकजुटीचा संदेश
9 फेब्रुवारीनंतर या चर्चांना सुरुवात होईल, असे संकेत देत रोहित पवार यांनी पुढील घडामोडींविषयी उत्सुकता वाढवली. त्यांच्या विधानांमुळे सुनेत्रा पवार यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य घडामोडींविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. एकूणच, रोहित पवार यांच्या वक्तव्यांमधून पवार कुटुंबाच्या एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न दिसून आला.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !