!-- afp header code starts here -->

महाराष्ट्रात आमदारांच्या 23 जागा रिक्त : विधानपरिषदेत मोठ्या घडामोडी


23 MLA seats vacant in Maharashtra: Big developments in Legislative Council मुंबई (13 फेब्रुवारी 2026) :  विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील पाच रिक्त जागांबाबत राजकीय वर्तुळात हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. या जागा लवकरच भरल्या जाण्याची शक्यता असून त्यासाठी प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.

काही महिन्यात बदलणार चित्र
सध्या विधानपरिषदेत एकूण 78 सदस्यसंख्या असताना त्यापैकी 55 सदस्य कार्यरत आहेत, तर 23 जागा रिक्त आहेत. याच पार्श्वभूमीवर 14 मे 2026 रोजी आणखी नऊ जागा रिक्त होणार आहेत. या नऊ जागा विधानसभेतील आमदारांमार्फत निवडून आलेल्या सदस्यांच्या आहेत. त्यामुळे या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून त्यातून नव्या सदस्यांची निवड होईल. या नऊ सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार आहे. परिणामी, पुढील काही महिन्यांत विधानपरिषदेचे चित्र लक्षणीयरीत्या बदलण्याची चिन्हे आहेत.


यांचा संपणार कार्यकाळ
ज्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे, निलम गोर्‍हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे. सध्या विधानसभेत 286 आमदार असल्याने मतदानाचा कोठा 36 आमदारांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गणितामुळे पक्षीय समीकरणे आणि संभाव्य आघाड्या यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

लवकरच होणार जागांवर निवड
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची रचना विधानसभेपेक्षा वेगळी आहे. हे सभागृह दर पाच वर्षांनी विसर्जित होत नाही. सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. एकूण 78 सदस्यांपैकी 30 सदस्य विधानसभेतील आमदारांकडून निवडले जातात. 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून निवडून येतात. शिक्षकांमधून 7 आणि पदवीधरांमधून 7 सदस्य निवडले जातात. तर 12 सदस्यांची नियुक्ती राज्यपाल साहित्य, कला, सहकार आणि सामाजिक सेवा या क्षेत्रांतून करतात. याच राज्यपाल कोट्यातील पाच जागा सध्या रिक्त असून त्या लवकरच भरण्यात येण्याची शक्यता आहे.

राज्यसभेच्या सात जागा रिक्त होणार
परिषदेसोबतच राज्यसभेच्या जागांबाबतही लक्ष वेधले जात आहे. महाराष्ट्रातून 2 एप्रिल 2026 रोजी राज्यसभेच्या सात जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे पुढील काळात राज्यसभा आणि विधानपरिषद या दोन्ही पातळ्यांवर मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे. या जागांसाठीही पक्षीय पातळीवर रणनीती आखली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. या घडामोडींचा परिणाम राज्याच्या व्यापक राजकीय समीकरणांवर होऊ शकतो.

या सदस्यांचा संपणार कार्यकाळ
ज्या सात सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे त्यामध्ये शरद पवार, रामदास आठवले, भागवत कराड, धैर्यशील पाटील, प्रियंका चतुर्वेदी, रजनी पाटील आणि फौजीया खान यांचा समावेश आहे. त्यामुळे 2026 च्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील संसदीय आणि विधानपरिषदेतील प्रतिनिधित्वाचे चित्र मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !