भुसावळ बसस्थानकावर मोबाईल चोरट्याला बेड्या : संशयीत निघाला जळगावातील तडीपार
Mobile thief handcuffed at Bhusawal bus stand: Suspect flees to Jalgaon भुसावळ (13 फेब्रुवारी 2026) : भुसावळ बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल लांबवणार्या एका अट्टल चोरट्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून दोन तरुणांचे एकूण 42 हजार रुपये किंमतीचे महागडे मोबाईल जप्त करण्यात आले. ही घटना गुरुवारी, 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली.
मोबाईल चोरी करताना पकडले
योगेश समाधान वराडे (रा.टाकळी, ता.जामनेर) हा तरुण आपल्या मित्रासह गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भुसावळ बसस्थानकावर आल्यानंतर बसमध्ये चढताना संशयित आरोपी तनवीर शेख रहीम शेख (रा.गेंदालाल मिल, जळगाव) याने नजर चुकवून योगेश आणि त्याच्या मित्राचे खिशातील दोन महागडे मोबाईल अत्यंत शिताफीने लांबवले.

मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच दोन्ही तरुणांनी तत्काळ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता, पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. योगेश वराडे याने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री 9 वाजता संशयित आरोपी तनवीर शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदार करीत आहेत.






