अमळनेरात बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त
तीन लाखांचा माल जप्त :दोन अटकेत ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
Fake liquor manufacturing factory destroyed in Amalner अमळनेर (14 फेब्रुवारी 2026) : शहरातील आर.के.नगरात बनावट देशी-विदेशी दारू निर्मिती करण्याचा कारखाना उध्वस्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन लाख एक हजार 735 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 12 रोजी रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी करण्यात आली.
गोपनीय माहितीद्वारे कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जी.एस.मोरे यांना व त्यांच्या पथकास मिळालेल्या माहितीनुसार, 12 रोजी मांडळ-जवखेडा रस्त्यावर एका विहिरीजवळ भावलाल सुखदेव पारवे (30, नवलनगर) हा अवैधरित्या देशी-विदेशी दारू वाहतूक करताना आढळून आला. अधिक चौकशीत त्याने अमळनेर शहरातील आर.के.नगरातील दिनेश प्रभाकर खांबायत (46) हा देशी-विदेशी दारू निर्मिती करीत असल्याची माहिती दिली.

असा मुद्देमाल झाला जप्त
जी.के.मोरे यांच्या समवेत निरीक्षक अ.कै.सु मोमीन, विपुल राजपूत, दिनेश पाटील, भूषण परदेशी, सुषमा सुल्ताने यांनी रात्री 9 वाजून 10 वाजता आर.के.नगरात छापा टाकला असता त्यांना 10 हजार 560 रुपयांच्या 48 विदेशी बाटल्या, 1210 रुपयांच्या 610 नग देशी दारूच्या बाटल्या, चार हजार रुपयांचा एक सीलबंद बॉक्स, 45 हजार रुपयांचे देशी दारू निर्मितीचे भरलेले 100 लिटर ब्लेडचा ड्रम, 47 हजार 250 रुपयांचा 105 लिटरचे देशी दारू निर्मितीचे ब्लेडचे कॅन, 25 हजार रुपये किंमतीचे दारू सील बंद करण्याचे मशीन, 30 हजार 550 रुपयांचे विदेशी दारू तयार करण्याचे ब्लेड, 50 हजार रुपयांची मोटरसायकल तसेच दारू वाहतूक करताना आढळून आलेली 85 हजार रुपये किमतीची मोटरसायकल (क्रमांक एम.एच.18 सीजी 1549) सह बुच, खाली बाटल्या मिळून तीन लाख एक हजार 735 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास जी.एस.मोरे करीत आहेत.






