दीड कोटींचा डीडी जमा करताच राजपाल यादवला हायकोर्टाकडून अंतरिम जामीन
Rajpal Yadav granted interim bail by High Court after depositing DD of Rs 1.5 crore नवी दिल्ली (16 फेब्रुवारी 2026) : विनोदी अभिनेता राजपाल यादव यांना हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. दीड कोटींचा डीडी जमा करण्याची अट त्यासाठी न्यायालयाने घातल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला.
न्यायालयाच्या अटीनंतर जामीन
अंतरिम जामीन अर्जावर सोमवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान पैसे देण्याच्या पद्धतीबाबत एक महत्त्वाचा वाद निर्माण झाला. यादव यांच्या वकिलांनी न्यायालयाला माहिती दिली की, ते एफडीआर (फिक्स्ड डिपॉझिट रिसीट) द्वारे दिड कोटी जमा करण्यास तयार आहेत. तथापि, न्यायमूर्ती शर्मा यांनी स्पष्ट केले की, ही रक्कम एफडीआरऐवजी केवळ डिमांड ड्राफ्ट (डीडी) द्वारे स्वीकारली जाईल.

न्यायालयाने ही देखील नोंद घेतले की, 25 लाख रुपयांचा एक डिमांड ड्राफ्ट आधीच जमा करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त 75 लाख रुपयांचा आणखी एक डीडी पूर्वी जमा करण्यात आला होता. न्यायालयाने स्पष्ट केले की, आता उर्वरित दीड कोटी रुपयांची रक्कम सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात जमा करणे बंधनकारक आहे.
न्यायमूर्ती शर्मा यांनी सुनावणीदरम्यान सांगितले की, जर निर्धारित वेळेत पूर्ण रक्कम जमा केली गेली, तर राजपाल यादव यांना अंतरिम जामिनावर सोडले जाईल तसेच जर ठरलेल्या वेळेपर्यंत पैसे भरले नाहीत, तर या प्रकरणावर मंगळवारी पुन्हा सुनावणी होईल.
सुनावणीदरम्यान न्यायालयाचा पवित्रा कठोर दिसला आणि पेमेंटच्या पद्धतीबाबत कोणतीही सवलत देण्यास नकार देण्यात आला. न्यायालयाने स्पष्ट केले की, आदेशांचे पालन निर्धारित स्वरूपातच केले पाहिजे.
लवकरच राजपाल यादव प्रकरणावर करणार भाष्य
राजपाल यादवचा मॅनेजर गोल्डी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हो, राजपलला जामीन मिळाला आहे. या बातमीने आम्ही सर्वच आनंदी झालो आहोत. राजपाल एक-दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर भाष्य करणार आहे. तोवर आम्ही काहीही सांगू शकत नाही. इंडस्ट्रीतील काही कलाकार राजपालच्या मदतीसाठी आले त्यांचे आभार.
राजपालचा भाऊ श्रीपाल यादव म्हणाले, आमच्यासाठी ही खूप मोठी दिलासादायक बातमी आहे. आता आमच्या जीवात जीव आला आहे. दरम्यान एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याला जामीन मिळाला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 18 मार्चला होईल.







