!-- afp header code starts here -->

चारचाकीच्या भीषण अपघातात विरवाडेतील दोघे युवक ठार


Two youths from Virwade killed in a horrific four-wheeler accident चोपडा (16 फेब्रुवारी 2026) : भरधाव कारला भीषण अपघात घडल्याने चोपडा तालुक्यातील विरवाडे गावातील दोन्ही तरुण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या अपघाताने विरवाडे गावावर शोककळा पसरली आहे. राहुल अमृत भोई (32) व मयूर अरुण राजपूत (24) अशी मृतांची नावे आहेत.

भरधाव चारचाकीला अपघात
जैन समाजाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी विरवाड्याहून चोपड्याकडे येणार्‍या चारचाकी गाडीला (क्रमांक एम.एच.19 बी.एस.1008) अपघात घडला. या अपघातात राहुल भोई व मयूर राजपूत हे तरुण ठार झाले तर विजय भोई (35), राकेश राजपूत (30) आणि बंटी कोळी (30) हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींपैकी विजय भोई यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले.  राकेश राजपूत व बंटी कोळी यांच्या हात आणि पायांना गंभीर दुखापत झाली असून  त्यांच्यावर चोपडा शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अखेरच्या दिवशी कार्यक्रमाला जाताना अपघात
पाचही तरुण गेल्या आठ दिवसांपासून जैन धर्मीयांच्या एका पारमार्थिक कार्यक्रमात सहभागी होत होते. सोमवारी या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असल्याने पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास हे तरुण विरवाड्याहून चोपड्याकडे येत असताना त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, राहुल आणि मयुर यांचा जागीच मृत्यू झाला.

नातेवाईकांचा हृदयद्रावक आक्रोश 
हे पाचही तरुण अत्यंत श्रद्धाळू होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी कडक उपवास धरला होता, त्यांनी घराचे अन्न व पाणी देखील प्राशन केले नव्हते. सोमवारी शेवटच्या दिवशी कार्यक्रम आटोपून ते अन्नाचा घास घेणार होते, मात्र त्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. इतकी भक्ती करूनही देव आडवा का आला नाही? देवा तू खरंच कुठे आहेस? असा टाहो रुग्णालयात नातेवाईकांनी फोडल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !