पिंप्रीसेकम फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत 45 वर्षीय अनोळखी महिला ठार
45-year-old unidentified woman killed in collision with unknown vehicle near Pimpri-Sekum junction भुसावळ (16 फेब्रुवारी 2026) : अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने 40 ते 45 वर्षीय अज्ञात महिला चिरडून ठार झाली. हा अपघात पिंपरीसेकम फाट्याजवळील महामार्ग क्रमांक 53 वर 13 रोजी पहाटे सव्वासहा वाजेपूर्वी घडली. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अज्ञात महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून ती भिकारी असल्याचा संशय आहे.
अपघातानंतर वाहन चालक पसार
सूत्रांच्या माहितीनुसार, अज्ञात वाहनधारकाने भरधाव वेगाने वाहन चालवत रस्त्याच्या कडेला चालणार्या 40 ते 45 वर्षीय महिलेला धडक दिली. या अपघातात महिला जागीच ठार झाली तर अपघातानंतर कुणी नसल्याची संधी साधून वाहन धारक पसार झाला. अपघात प्रकरणी निंभोरा पोलीस पाटील विजय मुरलीधर धांडे (40) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहन चालकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहेत.








