यावलच्या पाटचारीत दुचाकीला वाचवतांना थार कोसळली : जळगावातील चालक गंभीर जखमी
यावल (15 मार्च 2026) : भुसावळ रस्त्यावर शहराच्या बाहेर असलेल्या पाटचारीच्या पुलावर दुचाकीस्वाराला वाचवतांना थार कार अनियंत्रित होत थेट पाटचारीत कोसळली. या अपघातात कार चालकाला गंभीर दुखापत झाली. हा अपघात रविवारी दुपारी घडला. नागरिकांच्या मदतीने जखमीवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
काय घडले यावल शहरात ?
यावल-भुसावळ रस्त्यावरील पाटचारी जवळून रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास थार कार (क्रमांक एम.एच. 19- 77) घेऊन चेतन राजेंद्र तायडे (28, रा.जळगाव) हा तरुण यावलकडे येत असताना याचवेळी पाटचारीच्या पुलावर अचानक दुचाकीस्वार आला व त्याला वाचवण्याच्या बेतात चेतन तायडे याने अचानक ब्रेक दाबला असता कार अनियंत्रीत होऊन थेट पाटचारीत कोसळली. या अपघातात चेतन तायडे हा गंभीर जखमी झाला.




जखमी अवस्थेत नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉ.इरफान खान, डॉ. रोहित कोळी, अधिपरिचारीका जॉन्सन सोरटे आदींनी त्याच्यावर प्रथम उपचार केले. त्याला तातडीने पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.