भुसावळ पालिकेत सत्ताधारी-विरोधक पुन्हा भिडले : दुसर्‍यांदा सभा तहकूब

प्रसिद्धी माध्यमांना सभागृहात बसण्यापासून रोखले : तहकूब सभा 23 रोजी


गणेश वाघ
Ruling and Opposition Factions Clash Again at Bhusawal Municipality: Meeting Adjourned for the Second Time भुसावळ (17 मार्च 2026) : भुसावळ पालिकेची तिसरी सर्वसाधारण सभा शुक्रवार, 13 दुपारी चार वाजता सत्ताधारी-विरोधक भिडल्यानंतर तहकूब करण्यात आल्यानंतर ती मंगळवार, 17 रोजी ठेवण्यात आली होती. ही सभा वादळी होणार असल्याचे गृहीत धरून पोलिस प्रशासनाने पालिकेच्या परिसराला छावणीचे स्वरुप दिले व प्रवेशद्वारातून केवळ नगरसेवक पालिका सभेशी संबंधितानाच प्रवेश देण्यात आला. सभा सुरू झाल्यानंतर अधिकृत प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी सभागृहात दाखल झाल्यानंतर त्यांना पालिका प्रशासनाच्या अभियंत्यांने नगराध्यक्षांच्या सूचनेवरून सभागृहात बसण्यास मनाई केल्याचे जाहीर केल्यानंतर माध्यमांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध करीत सभागृह सोडले.

पुन्हा मागील सभेचा घडला कित्ता
मंगळवार, 17 रोजी दुपारी चार वाजता नगरपालिकेच्या सभागृहात गतवेळी तहकूब सभा होणार असल्याचे या सभेकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. सभेला सुरूवात होताच भाजपा पदाधिकार्‍यांनी नगराध्यक्षांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी सत्ताधारी नगरसेविकेने यास विरोध केल्यानंतर आधी महिलांमध्ये व नंतर पुरूष नगरसेवकांमध्ये शाब्दीक वादाला वाढण्यास सुरूवात झाली. यावेळी विरोधातील भाजपा नगरसेवक व सत्ताधारी नगरसेवक समोरा-समोर आल्यानंतर शाब्दीक वादामुळे गोंधळ अधिकच वाढून सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती अधिक गोंधळाची झाल्यानंतर नगराध्यक्षा गायत्री भंगाळे व माजी आमदार संतोष चौधरी यांनी दालन सोडले व त्यानंतर राष्ट्रवादीचे सत्ताधारीही सभागृहाबाहेर पडले.



भाजपा नगरसेवक संतप्त
यापूर्वी तहकूब झालेली सभा किमान आज मंगळवारी तरी सुरळीत चालेल, अशी अपेक्षा होती मात्र तीही फोल ठरली. भाजपा नगरसेवक नगराध्यक्ष भंगाळे यांना निवेदन देण्यावर ठाम असल्याने त्यावरून गोंधळ अधिक वाढला व सत्ताधार्‍यांनी दालन सोडल्यानंतर गोंधळ पुन्हा वाढला. यावेळी भाजपा नगरसेवकांनी उपनगराध्यक्षांनी सभा चालवावी, असा आग्रह धरला मात्र हा प्रयत्न असफल ठरला. यावेळी मुख्याधिकार्‍यांना नगरसेवकांनी किती वेळा सभा तहकूब करण्याचा नियम आहे? असा प्रश्न केला मात्र त्यांना उत्तर देता आले नाही. यावेळी सत्ताधार्‍यांनी पालिकेच्या दर्शनी भागावरील फलकावर सोमवार, 23 मार्च रोजी दुपारी चार वाजता सभा होणार असल्याचे जाहीर केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
सभागृहात व्यासपीठावर नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, मुख्याधिकारी राजेंद्र फातले, गटनेता सचिन चौधरी आदींची उपस्थिती होती.

पालिकेत प्रथमच घडले : तहकूब सभा आता 23 मार्चला
यापूर्वी 13 मार्च रोजी तहकूब झालेली सभा 17 मार्च रोजी होणार होती मात्र तीही नगरसेवकांच्या प्रचंड गदारोळानंतर तहकूब करण्यात आली. आता सोमवार, 23 मार्च रोजी दुपारी चार वाजता तिसर्‍यांदा सभा होत असून ही सभा तरी सुरळीत होवून शहर विकासाचे विषय मार्गी लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच तिसर्‍यांदा एकच सभा बोलावण्यात आल्याचा प्रकार घडल्याचे जाणकार सांगतात.

सभेच्या अजेंड्यावर 341 विषय
सभेच्या अजेंड्यावर तब्बल 341 विषय असून त्यात भुसावळातील बंद पडलेली सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत करण्यासह भुसावळकरांसाठी पालिकेच्या ईमारतीवर नाट्यगृहाची उभारणी, नगराध्यक्षांसह मुख्याधिकार्‍यांसाठी नवीन स्कॉर्पिओ वाहन खरेदी, शहरातील पुतळ्यांसाठी सीसीटीव्ही, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे योजनेंतर्गत विविध कामे करणे, पाणीटंचाई संदर्भात उपाययोजना, शहरातील वातानुकूलित शौचालयांची उभारणी, शहराच्या चौफेर प्रवेशद्वारांची उभारणी करणे, जामनेर रोडवरील स्वच्छतागृहांची उभारणी करणे यासह विविध विकासात्मक विषय सभेच्या अजेंड्यावर आहेत.

का होतोय गदारोळ ? भाजपाच्या मागील सभेतील विषयांना विरोध
तब्बल दोन वेळा गदारोळामुळे सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. या मागील कारणांचा शोध घेतला असता सभेच्या अजेंड्यावर पहिलाच विषय 3 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या सभेचे कार्यवृत्त कायम करणे हा आहे मात्र यालाच भाजपा नगरसेवकांचा तीव्र विरोध आहेत. गत बैठकीत भाजपाने अनेक विषयांना लेखी विरोध दर्शवत तसे लेखी निवेदन दिले. आताही सभा सुरू होण्यापूर्वी गतवेळी जे विषय भाजपाने नामंजूर केले आहेत त्याचे इतिवृत्त लिहू नये वा सभागृहात मंजूर करू नयेत, असा आग्रह भाजपाचा आहे व त्या संदर्भात ते निवेदन देण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र हे निवेदन स्वीकारले जात नसल्याने सभागृहात वादंग निर्माण होत आहे.

पत्रकारांना प्रवेश नाकारला : पत्रकार संघटना संतप्त
भुसावळ पालिकेच्या सभागृहात प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी गेल्यानंतर त्यांना प्रवेश नसल्याचे कारण देण्यात आले शिवाय ही सूचना नगराध्यक्षांनी केल्याचे पालिका अभियंत्याने माईकमधून सांगितल्याने माध्यमांनी नाराजी व्यक्त करीत दालन सोडले. हा प्रकार म्हणजे लोकशाहीच्या स्तंभावरच एक प्रकारचा आघात असल्याची भावना शहरातील पत्रकार संघटनांनी व्यक्त करीत घडल्या प्रकाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !