जळगाव तालुका हादरला : वादातून पत्नीला संपवले ; आरोपी पतीला अटक
Jalgaon Taluka Shaken: Wife Killed Following Dispute; Accused Husband Arrested जळगाव (20 मार्च 2026) : एकीकडे नववर्ष अर्थात गुढीपाडवा सणाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे मात्र जळगाव तालुक्यातील निमखेडी गावात कौटुंबिक वादात संतप्त पतीने पत्नीची हत्या केल्याची संतापजनक घटना शुक्रवार, 19 रोजी घडली. खुनानंतर आरोपी पोलिसांना शरण आला. दीपाली नितीन सोनवणे (28, रा.निमखेडी, ता.जळगाव) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून नितीन विजय सोनवणे या आरोपी पतीला अटक करण्यात आली.
वादानंतर पतीचे पाऊल
दीपाली सोनवणे या पती नितीन विजय सोनवणे (35) व दोन मुले, मुलीसोबत वास्तव्याला होत्या. हात-मजुरी काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. त्यांच्यात काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होता. शुक्रवार, 19 मार्च रोजी दुपारी पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला.

या वादात संतापाच्या भरात संशयित आरोपी नितीन सोनवणे याने लोखंडी विळ्याने पत्नी दीपालीच्या गळ्यावर आणि पोटावर गंभीरित्या वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी हा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला.
पोलिसांची घटनास्थळी धाव
खुनाची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि फॉरेन्सिक कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. मयत विवाहितेच्या पश्चात दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.
