एक हजारांची लाच भोवली : अक्कलकुवा पंचायत समितीतील कंत्राटी अभियंता नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
Bribe of ₹1,000 Proves Costly: Contractual Engineer at Akkalkuwa Panchayat Samiti Caught in Nandurbar ACB’s Net भुसावळ (21 मार्च 2026) : मंजूर असलेल्या घरकुलाचे फोटो अपलोड करण्याच्या मोबदल्यात कार्यालयातच एक हजारांची लाच स्वीकारताना अक्कलकुवा पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण विभागाचा कंत्राटी अभियंता नरेश देविदास बोरसे (38) यास नंदुरबार एसीबीने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोर हादरले आहेत.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराच्या चुलत भावाच्या नावाने जामली, ता.अक्क्लकुवा येथे घरकूल मंजूर असून त्यांना 15 हजारांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. दुसर्या हप्त्याचे 70 हजारांचे अनुदान मंजूर होणार असल्याने आरोपी नरेश देविदास बोरसे यांना घराचे फोटो काढून शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम होते मात्र त्यांनी या कामासाठी एक हजारांची लाच तक्रारदाराच्या भावाकडे मागितल्याने त्यांनी नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपीला पंचायत समितीतील गृहनिर्माण विभागाच्या कार्यालयात लाच स्वीकारताच अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास पाटील, हवालदार विजय ठाकरे, हवालदार देवराम गावीत, नरेंद्र पाटील, हवालदार जितेंद्र महाले, नाईक हेमंतकुमार महाले आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला. तपास निरीक्षक विकास लोंढे करीत आहेत.
