जीवनातील परीक्षांना हसत-खेळत सामोरे जा : दिनेश चव्हाण


Face Life’s Challenges with a Smile: Dinesh Chavan चाळीसगाव (21 मार्च 2026) : राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड चाळीसगाव येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव येथे मराठी विभाग अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त संपन्न झालेल्या विविध स्पर्धांचे काव्यवाचन, वक्तृत्व, निबंध, भित्तीपत्रिका, चित्रकला, काव्यलेखन, सुंदर हस्ताक्षर, अभिवाचन आणि जागर अहिराणीचा स्पर्धेतील यशस्वी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बक्षीसवितरण प्रसंगी चित्रकार कवी, साहित्यिक, विचारवंत दिनेश चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की, प्रथम अपयश जरी आले, तरी प्रयत्न करणे सोडू नका, स्पर्धेत उतरा, स्वतःला आपल्यातील गुण ओळखण्यासाठी आपणच मदत करायला हवी, जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाशिवाय यश मिळत नाही. काही परीक्षा ह्या प्रमाणपत्रासाठी असतात, तर काही आत्मिक समाधान व कौतुकासाठी असतात, जीवन जगतांना प्रत्येक मनुष्यप्राणी हा ह्या वेगवेगळ्या परिक्षामधून प्रवास करीत असतो, त्यामुळे जीवनात कधी काही अडचण आली तर आपले गुरुजन नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तयार असतात हे सांगताना “पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा”, ह्या कुसुमाग्रजांची कणा कवितेचे उदाहरण दिले, यावेळी प्रसिद्ध साहित्यिक ,विचारवंत सुनील गायकवाड सर हे देखील उपस्थित होते, आपल्या विचारातून, साहित्यिक क्रांतीची मशाल नेहमी धडगधगती ठेवा असे आवाहन करताना त्यांनी आपल्या काही स्वरचित कवितांचे सादरीकरण देखील केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य जी.बी.शेळके म्हणाले की, खान्देशात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषांचे संशोधन केले तर खान्देशातील अनेक कलाकार, कलागुण, इतिहास जनतेसमोर येईल.


यावेळी स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सुनील गायकवाड व दिनेश चव्हाण यांचे हस्ते करण्यात आला, यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.बी.शेळके, उपप्राचार्य प्रा.डॉ.जी.डी. देशमुख, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.एच.आर.निकम. मराठी विभागप्रमुख के.पी.रामेश्वरकर, प्रा.डॉ.उज्वला नन्नावरे, डॉ.बाळासाहेब सूर्यवंशी आदी उपस्थीत होते. आभार मानसी गोसावी यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !