सोशल मिडीयावरील रीलच्या नादात भाजपा पदाधिकार्याच्या मुलाचा मृत्यू
Son of BJP Office-bearer Dies While Making Social Media Reels हुबळी (21 मार्च 2026) : सोशल मीडियावरील रील आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कर्नाटकच्या हुबळीत भाजपा पदाधिकार्याच्या मुलाचा मृत्यू घडला. कर्नाटकचे भाजप नेते वीरभद्रप्पा संगलाद यांचा 15 वर्षीय मुलगा नमीश संगलाद याचा एका रील शूटिंगदरम्यान झालेल्या भीषण अपघातात मृत झाला. ऑडी कार आणि इलेक्ट्रिक दुचाकी यांच्यातील हाय-स्पीड स्टंटमुळे हा अपघात झाला. पोलिसांनी याप्रकरणी कार चालवणार्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला.
असा घडला अपघात ?
नमीश हा म्हैसूरमध्ये नववीत शिकत होता. गुरुवार, 19 मार्च रोजी उगादी सण साजरा करण्यासाठी तो हुबळीतील आपल्या घरी आला. . गुरुवारी दुपारी 4:30 ते 4:45 च्या सुमारास नमीश आपल्या मित्रांसह हुबळीच्या बाहेरील बाजूस असलेल्या शेजावाडकर लेआउट या निर्जन ठिकाणी रील शूट करण्यासाठी गेला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तरुण अॅक्शन ब्रेक रील बनवत होते. यामध्ये समोरून येणारी ऑडी कार आणि विरुद्ध दिशेने येणारी ओला इलेक्ट्रिक दुचाकी वेगाने एकमेकांकडे येतात आणि शेवटच्या क्षणी ब्रेक लावून वळण घेतात. या चित्रीकरणादरम्यान कार चालवणार्या अल्पवयीन मुलाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने नमीशच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार नमीशच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी नमीशचे वडील वीरभद्रप्पा संगलाद यांनी तक्रार दाखल केली आहे.
