भुसावळ पालिकेत राजकारण पेटले : सत्ताधार्‍यांवर विश्वास नसल्याने भाजपा नगरसेवकांकडून तहकूब सभेबाबत खातरजमा !

3 फेब्रुवारीच्या सभेबाबत उद्या जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी : विकास हवाय मात्र पारदर्शक पद्धत्तीने ; गटनेता युवराज लोणारी


Hearing Before the District Collector Tomorrow Regarding the February 3rd Meeting: “We Want Development, But Through Transparent Methods” — Group Leader Yuvraj Lonari भुसावळ (23 मार्च 2026) : भुसावळ पालिकेत सत्ता बदल झाल्यानंतर राजकीय आखाडा तापल्याचे चित्र आहे. सातत्याने दोन सभा वादळी झाल्यानंतर तिसरी सर्वसाधारण सभा तिसर्‍यांदा तहकूब करण्याची वेळ सत्ताधार्‍यांवर आली व या प्रकरणी नगराध्यक्षांनी रविवारी प्रसिद्धी पत्राद्वारे विरोधक विकासाला खीळ घालत असल्याचा आरोप केला. 20 मार्च रोजी सोशल मिडीयाद्वारे सोमवार, 23 रोजी पालिकेची सभा तहकूब करण्यात आल्याचे कळवण्यात आल्यानंतरही भाजपाच्या 27 नगरसेवकांनी सभेच्या नियोजित वेळी दुपारी चार वाजता पालिका सभागृह गाठत सभा खरोखर तहकूब झाली वा नाही? याची खातरजमा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

तिसर्‍यांदा सभा तहकूब : भाजपाकडून सभागृहात जावून खातरजमा
भुसावळ पालिकेच्या आतापर्यंत झालेल्या दोन्ही सभा वादळी ठरल्या असून त्यात भाजपाने अनेक विषयांवर लेखी आक्षेप नोंदवला आहे तर तिसरी सर्वसाधारण सभा 13 मार्च रोजी होणार असताना या सभेत निवेदन देण्यावरून ही सभा तहकूब होवून 17 मार्च रोजी ठेवण्यात आली व या सभेत प्रसिद्धी माध्यमांना सभागृहात मज्जाव केल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये निवेदन स्वीकारण्यावरून घमासान झाल्यानंतर यावेळीदेखील सभा तहकूब करून ती 23 मार्च रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले मात्र अचानक ही सभादेखील तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे नगराध्यक्षांनी कळवल्यानंतर भाजपा व मित्रपक्षातील 27 नगरसेवकांनी सोमवारी दुपारी चार वाजता पालिका सभागृह गाठत खरोखर सभा रद्द झाली वा नाही ? याबाबत खातरजमा केली. हा प्रकार म्हणजे विरोधकांना सत्ताधार्‍यांवर विश्वास नसल्याचे दर्शवतो.


तत्कालीन सभेतील ठराव रद्दबाबत उद्या जळगाव जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी
3 फेब्रुवारीच्या सभेतील अनेक विषयांवर भाजपाने हरकत नोंदवत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली आहे. या सभेतील ठराव रद्द करण्यात यावे, अशी भाजपाची प्रमुख मागणी आहे तर या अपिलावर मंगळवार, 24 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी होणार असल्याने या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 च्या कलम 308 अंतर्गत दाखल अपिलानुसार आक्षेप घेण्यात आलेले ठराव रद्द करण्याची भाजपा नगरसेवकांची प्रमुख मागणी आहे.

कायद्यावर विश्वास : पारदर्शक कामाची अपेक्षा ; गटनेता युवराज लोणारी
सोमवारी पालिकेत सर्व भाजपाचे 27 नगरसेवकांनी प्रत्यक्षात सभा खरोखरच तहकूब झाली आहे वा नाही याची पाहणी केली व सभा तहकूब झाल्याबाबत खातरजमा केली आहे. आमचा कायद्यावर पूर्णपणे विश्वास असून शहरात पारदर्शक पद्धत्तीने विकासकामे होण्याची अपेक्षा आहे. जनतेच्या पैशांचा आम्ही अपव्यय होवू देणार नाही, असे गटनेता युवराज लोणारी यांनी यावेळी सांगितले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !