कोम्बिंगमध्ये यावलच्या अट्टल दुचाकी चोरट्यांना रावेर पोलिसांच्या बेड्या


Raver Police Nab Notorious Two-Wheeler Thieves from Yawal During Combing Operation रावेर (24 मार्च 2026) : रावेरात पोलिसांनी राबवलेल्या कोम्बिंगमध्ये यावलमधील दोन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात यंत्रणेला यश आले. आरोपींनी 23 रोजी शहरातून लांबवलेली महागडी दुचाकी व अन्य चोरीची दुचाकी आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आली. आमीर खान अजमल खान (19, रा.खिर्णीपुरा, यावल) व रोहित अशोक बिन्हाडे (18, रा. सिद्धार्थ नगर, यावल) अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांच्याकडून एकूण 94 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

लग्न हॉलबाहेरून लांबवली दुचाकी
रावेरातील रहिवासी अब्दुल रफीक अब्दुल कादर (53) हे सोमवार, 23 रोजी शहरातील लतिफ हॉलमध्ये लग्न समारंभासाठी होंडा युनिकॉर्न (एम.एच.19 डी.डब्ल्यू.4895) द्वारे आल्यानंतर काही क्षणातच चोरट्यांनी ही दुचाकी लांबवली होती. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शहरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले मात्र धागेदोरे गवसले नव्हते.


कोम्बिंगमध्ये अडकले चोरटे
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार मंगळवारी रात्री शहरात नाकाबंदी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात तपासणी सुरू असताना दोन संशयित तरुण दुचाकीसह आढळून आल्यानंतर कागदपत्रांची मागणी केल्यानंतर ते उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी लतिफ हॉल येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

अवैध धंद्यावरही कारवाई
पोलिसांनी चार जुगार अड्ड्यांवर छापे टाकून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कारवाई केली तसेच सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणार्‍या तिघांसह बेकायदेशीररीत्या गावठी दारू विकणार्‍या दोघांवर गुन्हे दाखल केले.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक सुनील मोरे, उपनिरीक्षक तुषार पाटील, गुन्हे शोध पथकातील नाईक कल्पेश आमोदकर, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, विशाल पाटील, सुकेश तडवी, गजानन बोने, संभाजी बिजागरे, मुकेश सोनवणे, तथागत सपकाळे आदींच्या पथकाने केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !