भोंदू अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय : पोलिसांच्या सतर्कतेने टळला हल्ला


Suspected of Offering Five Human Sacrifices : Attack Averted Due to Police Vigilance नाशिक (24 मार्च 2026) : नाशिकमधील भोंदू अशोक खरातने तब्बल पाच नरबळी दिल्याचा संशय असून या प्रकरणातील गुंता अधिकच वाढत चालला आहे. महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेतील भोंदू अशोक खरातला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. संक्षिप्त सुनावणीत पोलिसांनी खरातवर नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोर्ट परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी भोंदू खरातच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

आरोपीचा पोलिस कोठडीत मुक्काम 
अशोक भोंदू खरातला कोर्टाने 24 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्याला मंगळवारी नाशिक सत्र न्यायालयात हजर केले असता सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली पण बचाव पक्षाने त्याला विरोध केला. अखेर कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तत्पूर्वी, झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने भोंदू खरातवर एक-दोन नव्हे तर तब्बल 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला.


काय घडले न्यायालयात?
एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाचे अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यानी न्यायालयात प्रकरणाच्या तपासाची सद्यस्थिती सांगताना अशोक खरात विषयी अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, आरोपी अशोक खरात महिलांना खडे, पेढे देत होता. त्यांना पाण्यात काही पदार्थ मिसळून ते पिण्यास देत होता. यामुळे महिलांना अस्वस्थ वाटत असे. त्यानंतर तो त्यांचे लैंगिक शोषण करत असे. पोलिसांनी आरोपीच्या फार्म हाऊसमधून पिस्तूल, काडतुसे, रोकड व काही इलेक्ट्रॉनिक साहित्यही जप्त केले आहे. आरोपीकडे असणार्‍या एकूण काडतुसांपैकी काही काडतुसे गहाळ आहेत त्यामुळे त्यांचा कुठे काही वापर झाला का? याचा तपास केला जात आहे. आरोपीने काही विधींमध्ये नरबळी दिल्याचा संशयही आम्हाला आहे.

सिद्ध पुरुष असल्याचे सांगत सुरू होती फसवणूक
अशोक खरात आपण सिद्ध पुरुष असल्याचे सांगत लोकांची फसवणूक करत होता. तो नकली साप व वाघ यांचा वापर करून भीती निर्माण करत होता. तो कस्तुरीसारख्या वस्तूंचा वापर करत होता त्यामुळे त्याने वन्यजीव कायद्याचेही उल्लंघन केल्याचा संशय आहे. परिणामी, या प्रकरणाच्या तपासासाठी आम्हाला त्याच्या आणखी 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली मात्र बचाव पक्षाने त्यावर जोरदार हरकत घेत आणखी पोलिस कोठडीची गरज नाही,पोलिसांकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असून, पुढील तपास आरोपी न्यायालयीन कोठडीत असतानाही होऊ शकतो, असे ते म्हणाले.

ईशान्येश्वर मंदिरातील विधी, आर्थिक व्यवहार व इतर बाबींचा तपास अद्याप बाकी असल्याचा युक्तीवादानंतर अखेर न्यायालयाने आरोपीवर असणारे गंभीर आरोप व तपासातील नव्या गोष्टी लक्षात घेऊन भोंदू खरातला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

न्यायालय परिसरात खरातच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न
न्यायालयीन सुनावणीनंतर पोलिस अशोक खरातला कडेकोट बंदोबस्तात नेले जात असताना न्यायालय परिसरात उभ्या असलेल्या जमावाने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत खरातला तेथून घेऊन निघून गेले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी न्यायालय परिसरात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. मला संधी मिळाली तर मी खरातच्या कानाखाली वाजवेल, असे देसाई यावेळी म्हणाल्या.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !