जळगाव जिल्ह्यात केळीला अत्यल्प दर ; आमदार अमोल जावळे यांची जिल्हाधिकार्यांकडे कारवाईची मागणी
Extremely Low Prices for Bananas in Jalgaon District; MLA Amol Javale Demands Action from the District Collector. रावेर (25 मार्च 2026) : जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकर्यांना सध्या अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी जिल्हाधिकार्यांकडे पत्राद्वारे तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
अत्यल्प दराने केळीची खरेदी
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, जळगाव जिल्ह्यातील केळीचे दर हे परंपरेने बर्हाणपूर मंडीतील दरांवर आधारित ठरवले जातात. सध्या बर्हाणपूर मंडीमध्ये केळीचा दर सुमारे रु. 1600 ते 1700 प्रति क्विंटल इतका असताना, जळगाव जिल्ह्यातील काही व्यापारी शेतकर्यांकडून केवळ रु. 500 ते 600 प्रति क्विंटल या अत्यल्प दराने खरेदी करत आहेत.

हा दर अत्यंत अन्यायकारक असून, यामुळे शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली असून, त्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होत असल्याचे आमदार जावळे यांनी पत्रात नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर, संबंधित व्यापार्यांच्या व्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शेतकर्यांना केळीला योग्य व न्याय्य बाजारभाव मिळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी केली आहे.




