अंगाईचा मंद लय, शांत सूर बाळाच्या मेंदूला विश्रांती घेण्याचेच संकेत देतात
भुसावळ (25 मार्च 2026) : अंगाईचा मंद लय, शांत सूर बाळाच्या मेंदूला विश्रांती घेण्याचे संकेत देतात. अर्थात, ती बाळाची चिडचिड थांबते, रडणे कमी होते आणि त्याला नैसर्गिकरीत्या शांत झोप लागते. मात्र, मोबाइलच्या युगात आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अंगाई गाणारी आई आणि आजी घरात एकत्र दिसणं दुर्मीळ बनले आहे, असे मत हिंगोलीचे कवी गणेश आघाव यांनी भुसावळात व्यक्त केले.
सहकार नगरातील विवेक वणीकर यांच्या निवासस्थानी आयोजित छोटेखानी ‘आघाववाडीची गाणी’ या काव्यगायन कार्यक्रमात ते बोलत होते. वयाची नव्वदी पार केलेल्या कमल वसंत वणीकर आणि त्यांच्या स्नूषा शोभा वणीकर यांनी गोष्टींचं पुस्तक भेट देऊन आघाव यांचे स्वागत केले. कवी आघाव यांनी सर्वप्रथम अंगाई गाणे हे केवळ बाळासाठीच नाही, तर आईसाठीही एक प्रकारचे थेरपी असते. गाण्यामुळे आईच्या मनातील ताण कमी होतो आणि तिलाही प्रसन्न वाटते, ज्याचा सकारात्मक परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. आधी घरोघरी झोका बांधलेला असायचा. आजी किंवा आई बाळाला जोजवायची. हल्ली मात्र हे चित्र दुर्मीळ झाले आहे असे सांगितले. त्यानंतर त्यांनी ’इंद्रायणी’ ही कविता सादर केली.

वारकरी संप्रदाय, भक्ती आणि विठ्ठल भेटीची ओढ यांचे अत्यंत सुंदर दर्शन घडवणारी ही रचना आहे. ही कविता केवळ नदीचे वर्णन नसून ती मनाच्या निर्मळतेचे आणि भक्तीच्या प्रवासाचे प्रतीक मानली जाते. ‘मळ्यावर माझ्या पाखरांच्या खेपा, काड्यांचा विणती सुगरणी खोपा’, ‘भुईच्या दाराला मिरुग सांडतो, बैला संगती मोघडा हाकतो’ या शेतीमातीच्या कविताही सादर करून त्यांनी टाळ्या मिळवल्या. ‘माती डिजिटल झालीय’ या शिर्षकाच्या कवितेतून त्यांनी काव्यनिर्मितीची परिभाषा कशी बदलत चालली आहे हे अधोरेखीत केले.
‘पोरीला शाळेत निघाल्या’ला दाद
स्त्री-शिक्षणाच्या चळवळीला शब्दांत गुंफणारा एक सुंदर आविष्कार असलेली ‘पोरीला शाळेला निघाल्या’ ही कविता कवी आघाव यांनी लय-ताल आणि सूरात सादर केली. जपानी भाषेसह 32 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये आणि अनेक भारतीय बोलीभाषांत या कवितेचा अनुवाद झाला आहे. महाराष्ट्रातील एका शेतकर्याच्या मुलींचे शिक्षण आणि डोंगरवाटांचे चित्रण करणारी ही कविता, चक्क जपानच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट आहे. त्यातील ‘पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, पर्यांना पुसती तुम्ही गं कुणाच्या?’ या ओळी काळजाला भिडल्या. ही कविता त्यांनी लेवागणबोली, गुजराती, राजस्थानी भाषेतही म्हटली.
घरोघरी कवितेचा सूर घुमू द्या
कुटुंबात सुसंवाद, प्रसन्न वातावरण कायम ठेवायचे असेल तर कविता, अभंग, बालगाण्यांचा सूर घुमला पाहिजे. अर्थात, त्यासाठी आजी नावाचं विद्यापीठ प्रत्येकानं जपलं पाहिजे. तिच्याकडून गोष्टी, कथा, चुटकुले, लोकगाणी श्रवण करण्याची नितांत गरज आहे. ज्या घरात तीन पिढ्या एकत्र नांदताना दिसतात ते घर परमवैभवाला पोहोचले आहे असे समजावे. संतांचा सहवास लाभणे हे भाग्याचं लक्षण आहे असा विचारही कवी आघाव यांनी दिला. पेरणीच्या, कणसांच्या, मातीच्या, स्थलांतरितांच्या कविता सादर करताना त्यांनी संत तुकारामांच्या अभंगांसह वारकरी संप्रदाय, भक्ती आणि विठ्ठल भेटीची ओढ यांचे सुंदर दर्शन घडवणार्या रचनाही सादर केल्या.




