भाजपाच्या हरकतीनंतर भुसावळ पालिकेच्या पहिल्या सभेतील 177 विषयांना जिल्हाधिकार्‍यांकडून ‘तूर्तास स्थगिती’

पुढील सुनावणी 2 एप्रिल रोजी ; अपिलाच्या निकालाकडे शहरवासीयांचे लक्ष


Following objections raised by the BJP, the District Collector places a ‘temporary stay’ on 177 agenda items from the first meeting of the Bhusawal Municipal Council. भुसावळ (24 मार्च 2026) : भुसावळ पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर 3 फेब्रुवारी रोजी झालेली पहिलीच सभा वादळी ठरली होती. 250 हून अधिक विषय सभेच्या अजेंड्यावर असताना भाजपाने सभेतील 177 विषयांना नामंजूर करीत जिल्हाधिकार्‍यांकडे महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 च्या कलम 308 अंतर्गत अपिल दाखल केले होते. या अपिलावर मंगळवार, 24 रोजी दुपारी एक वाजता सुनावणी झाली. दोन्ही बाजूकडील युक्तीवादानंतर जिल्हाधिकार्‍यांनी हरकत घेतलेल्या 177 विषयांना 2 एप्रिलपर्यंत तूर्तास स्थगिती (जैसे थे) दिल्याची माहिती भाजपा गटनेते युवराज लोणारी यांनी दिली.

‘लाडका नगरसेवक’ योजनेवरून गाजली होती सभा
पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर सत्तेच्या चाव्या शरद पवार गटाच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्याकडे आल्या व त्यांच्या उपस्थितीत 3 फेब्रुवारी सभा झाली मात्र 250 अजेंड्यावरील विषयांपैकी बहुतांश विषय एकाच प्रभागातील नगरसेवकाशी निगडीत असल्याने ‘लाडका नगरसेवक’ योजना सत्ताधार्‍यांनी आणली असल्याची खोचक टीका पालिकेतील भाजपा विरोधकांनी धरत तब्बल 177 विषयांना लेखी हरकत नोंदवली होती शिवाय संख्याबळाचा विचार करता भाजपा पालिकेतील मोठा पक्ष ठरल्याने त्यांनी लेखी विरोध केलेल्या विषयांना नामंजूर करण्याची मागणी करीत जिल्हाधिकार्‍यांकडे अपिलही दाखल केले होते.


जिल्हाधिकार्‍यांकडून 2 एप्रिलपर्यंत ‘त्या’ विषयांना स्थगिती
बुधवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या दालनात भाजपाच्या अपिलावर सुनावणी झाली. यावेळी सत्ताधार्‍यांतर्फे अ‍ॅड.कात्यायनी तर भाजपातर्फे अ‍ॅड.बोधराज चौधरी व अ‍ॅड.संदीप ठाकरे यांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजूकडून प्रभावी युक्तीवाद करण्यात आला तर भाजपातर्फे काही विषयांचे यापूर्वीच ठराव करण्यात आल्याने
हे विषय अत्यावश्यक नाही, दुसर्‍या कामांना मंजुरी द्यावी, पालिकेची आर्थिक स्थिती तशी नाही आदी बाबी पटवून देण्यात आल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी 2 एप्रिलपर्यंत भाजपाच्या आक्षेप घेतलेल्या 177 विषयांना तूर्तास स्थगिती दिली. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयामुळे सत्ताधार्‍यांना भाजपाने हरकत घेण्यात आलेल्या विषयांवर आता कुठलीही कार्यवाही पुढील आदेश येईपर्यंत करता येणार नाही.

यांची होती उपस्थिती
सत्ताधार्‍यांतर्फे अपिलात बाजू मांडण्यासाठी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे व कार्यकर्ते तर भाजपातर्फे गटनेता युवराज लोणारी, पिंटू कोठारी, पिंटू ठाकूर, किरण कोलते, अ‍ॅड.बोधराज चौधरी, सतीश सपकाळे, पुरूषोत्तम नारखेडे, रुपेश देशमुख आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकार्‍यांकडून 2 एप्रिलपर्यंत ‘त्या’ विषयांना स्थगिती
भाजपा गटनेता युवराज लोणारी म्हणाले की, आम्ही कायद्याच्या मार्गाने जिल्हाधिकार्‍यांकडे अपिल दाखल केले आहे. आजच्या सुनावणीत आमच्या वकिलांनी मुद्दे पटवून दिल्याने भाजपाने हरकत घेतलेल्या ठरावांना 2 एप्रिलपर्यंत कुठलीही अंमलबजावणी करू नये, असे निर्देश दिले आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !