अवैध वाळूसह गौणखनिज पोलिसांच्या रडारवर : भुसावळात तीन वाहने जप्त
Illegal Sand and Minor Minerals on Police Radar: Three Vehicles Seized in Bhusawal भुसावळ (24 मार्च 2026) : जिल्ह्यात अवैधरित्या वाळू वाहतुकीचा मुद्दा गाजत असताना भुसावळ विभागात पोलिसांनी अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्या तीन वाहनांवर जप्तीची कारवाई करीत ही वाहने तहसील प्रशासनाकडे दंडात्मक कारवाईसाठी जमा केली. प्रशासनाकडून या वाहनांवर आता मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
कारवाईने उडाली खळबळ
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतर उपअधीक्षक केदार बारबोले यांनी नाकाबंदीचे आदेश दिल्यानंतर भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीत सुनसगावजवळील वाघूर नदीच्या पुलावर नाकाबंदीदरम्यान वाळूने भरलेला ट्रक (एम.एच.19 झेड.0932) आढळल्यानंतर चालक अनिल सुपडू सोनवणे (24, रा.बांभोरी) कडे वाळू वाहतुकीचा परवाना आढळला नाही शिवाय डंपर (यु.पी.53 जी.टी.1171) वरील चालक आकाश सुरेश पारधी (25, रा.धानोरा) कडेही आवश्यक परवाना अथवा कागदपत्रे उपलब्ध नसल्याने तसेच दोन्ही वाहनांचे मालक निशीकांत कैलास पाटील (रा.शिवकॉलनी, जळगाव) व विजय आत्माराम सपकाळे (रा.जावईनगर, बांभोरी) यांनीही कोणतीही कागदपत्रे सादर न केल्याने संबंधित ट्रक व डंपर जप्त करण्यात आले.

गस्तीदरम्यानही कारवाई
उपअधीक्षक केदार बारबोले हे रात्रगस्तीवर असताना बोदवड पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदीदरम्यान ट्रक (एम.एच.46 सी.एल.6304) मधूनही अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात असताना चालक गणेश रघुनाथ भोई (24, रा.जळका) आढळल्याने हे वाहन बोदवड तहसीलदारांच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.




