भुसावळ विभागात आरपीएफचे व्यापक जनजागृती अभियान

प्रवासी सुरक्षेसाठी विविध उपाययोजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन


भुसावळ (8 एप्रिल 2026) : प्रवाशांची सुरक्षा बळकट करण्यासह रेल्वे परिसरातील सतर्कता वाढविण्याच्या उद्देशाने भुसावळ रेल्वे विभागातील रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) तर्फे 1 एप्रिल ते 6 एप्रिल या कालावधीत विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले.

या अभियानादरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ राहणार्‍या नागरिकांना विविध सुरक्षाविषयक बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ट्रॅकवर बाह्य वस्तू ठेवणे, रेल्वे साहित्य चोरी करणे तसेच रील बनविण्यासारख्या धोकादायक कृत्यांचे गंभीर परिणाम नागरिकांना समजावून सांगण्यात आले. तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.


ट्रेन ये-जा करत असताना ट्रॅकजवळ उभे राहणे किंवा निष्काळजीपणे ट्रॅक ओलांडणे किती धोकादायक आहे, याची जाणीव करून देण्यात आली. प्रवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने फुटओव्हर ब्रिज व अंडरपासचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला.

अनोळखी व्यक्तीकडून खाणे-पिणे स्वीकारू नये, नशायुक्त पदार्थांपासून सावध राहावे, याबाबतही विशेष जनजागृती करण्यात आली. रेल्वे ट्रॅकवर जनावरे येऊन अपघात होऊ नयेत यासाठी पशुपालकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.

अवैध चेन पुलिंगमुळे रेल्वे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो, याची माहिती देत अशा प्रकारांवर दंडात्मक कारवाई होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच ज्वलनशील व स्फोटक पदार्थ रेल्वेत नेण्यास कडक बंदी असल्याचेही सांगण्यात आले.

प्रवाशांच्या सामान चोरी व फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. रेल्वे स्थानके, प्लॅटफॉर्म व गाड्यांमध्ये उद्घोषणा, प्रत्यक्ष संवाद तसेच डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने जनजागृती करण्यात आली.

या अभियानामुळे प्रवासी व नागरिकांमध्ये सुरक्षा, जबाबदारी आणि सतर्कतेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून सुरक्षित व सुरळीत रेल्वे संचालनाला चालना मिळणार आहे. भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार आरपीएफने व्यक्त केला आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !