बनावट रेल्वे पोलिस बनत गंडा घालणारी एमपीतील टोळी हिंगोली पोलिसांच्या जाळ्यात


Madhya Pradesh-based gang that swindled people by posing as railway police lands in Hingoli Police’s net. हिंगोली (8 एप्रिल 2026) : बनावट रेल्वे पोलिसांची टोळी हिंगोली पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. विशेष म्हणजे टोळी सदस्य हे पोलिसांनाच गंडा घालत असल्याचे तपासातून समोर आले आहे. हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

असे आहे प्रकरण
आरोपी अज्ञात क्रमांकावरून फोन करत स्वतःची ओळख ’खंडवा रेल्वे स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज कुमार’ अशी करून देत होते. ते बनावट रेल्वे अपघाताची कथा सांगून संबंधितांना भावनिक जाळ्यात अडकवत होते. कळमनुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रेमप्रकाश माकोडे यांनाही असा फोन आला होता.


खंडवा येथे कळमनुरीतील एका मुलीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असून मृतदेह पाठवण्यासाठी आइस बॉक्स खरेदी करायचा आहे, असे सांगत 5 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. माणुसकीच्या भावनेतून माकोडे यांनी तातडीने पैसे पाठवले.

संशय आल्याने उघड झाला प्रकार
असाच प्रकार वसमत ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्यासोबत घडला मात्र त्यांना संशय आल्याने त्यांनी घटनेची खातरजमा केली. तपासात खंडवा येथे असा कोणताही अपघात घडलेलाच नसल्याचे समोर आले आणि फसवणुकीचा प्रकार उघड झाला.

मध्यप्रदेशात जाऊन आरोपींना अटक
यानंतर हिंगोली पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला. तांत्रिक तपासाद्वारे या टोळीचे धागेदोरे मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यापर्यंत पोहोचले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत कारवाई करत अमित कुर्मी, वीरसिंग गौंड आणि भारत कुर्मी या तिघांना अटक केली. या प्रकरणातील सीताराम कुर्मी हा चौथा आरोपी अद्याप पसार असून त्याचा शोध सुरू आहे.

देशभरात फसवणुकीचा संशय
प्राथमिक तपासात या टोळीने देशभरात अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनाच फसवणार्‍या या टोळीचा पर्दाफाश झाला असला तरी या घटनेतून नागरिकांनी सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !