उद्घाटनानंतरही किनगाव ग्रामीण रुग्णालय बंद ; कर्मचारी टंचाईमुळे सेवा ठप्प
उद्घाटनानंतर अद्याप प्रत्यक्षात सुरू झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली
यावल (10 एप्रिल 2026) : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथील नव्याने उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2024 मध्ये ऑनलाईन प्रणालीद्वारे उद्घाटन होऊनही अद्याप प्रत्यक्षात सुरू झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून यामागे मोठ्या प्रमाणातील कर्मचारी टंचाई हे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट होत आहे.
या रुग्णालयात लिपिक, सहाय्यक अधीक्षक, औषध निर्माण अधिकारी तसेच इतर आवश्यक कर्मचारी पदे रिक्त असल्याने संपूर्ण आरोग्य सेवा सुरू होऊ शकलेली नाही व त्यामुळे स्थानिक नागरिकांना अद्यापही उपचारासाठी इतरत्र जावे लागत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत जिल्हा रुग्णालय जळगाव येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील वि. सानप यांनी नाशिक मंडळाच्या उपसंचालक (आरोग्य सेवा) यांना पत्र पाठवून तात्काळ पदभरती करण्याची मागणी केली असून रुग्णालयाचे कामकाज सुरळीत करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी उपलब्ध करून देण्याचाही पर्याय सुचविण्यात आला आहे.

दरम्यान, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समिती, किनगाव यांनीही या प्रश्नावर पुढाकार घेत प्रशासनाचे लक्ष वेधले असून समितीच्या पदाधिकार्यांनी सह्या करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे उद्घाटन होऊनही रुग्णालय सुरू न होण्यामागील प्रशासनिक विलंब व कर्मचारी अभाव यावर आता त्वरित निर्णय होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

